क्रिकेट सामन्यानंतर झिम्बाब्वेचे राष्ट्रपती आणि पाकिस्तानचे पंतप्रधान ट्वीटरवर भिडले

    गुरुवारी झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तान यांच्यात झालेल्या टी २० विश्वचषकातील सामन्यात पाकिस्तानचा अवघ्या एका धाव संख्येने पराभव झाला. पाकिस्तानचा विश्वचषक सामन्यातील हा सलग दुसरा पराभव असून २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या भारताकडूनही पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागला होता. हे दोन्ही पराभवामुळे पाकिस्तान संघ आणि त्यांचे चाहते निराश आहेत.

    काल झालेल्या झिम्बाब्वेच्या या झुंजार विजयाची दखल फक्त दिग्गज क्रिकेटपटूंनी नाही तर देशाच्या प्रमुखांनी देखील घेतली. झिम्बाब्वेच्या राष्ट्रपतींनी सामन्यानंतर ट्विटवर पाकिस्तानवर खोट्या मिस्टर बीनवरून खोचक ट्विट केले होते. झिम्बाब्वेचे अध्यक्ष इमेर्सन दामबुदझो (Emmerson Dambudzo) यांनी संघाचे अभिनंदन करणारे ट्विट केले. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, ‘झिम्बाब्वेचा दमदार विजय, अभिनंदन चेव्हरॉन्स. पुढच्या वेळी खरा मिस्टर बीन पाठवा…’ झिम्बाब्वेच्या अध्यक्षांनीच पाकिस्तानला खोटा मिस्टर बीन पाठवल्याप्रकरणी चिमटा काढल्यामुळे हे ट्विट चांगलेच चर्चेत आले होते.

    झिम्बाब्वेच्या अध्यक्षांच्या या ट्विटला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी प्रत्युत्तर दिले. मात्र हे प्रत्युतर कमी आणि खोट्या मिस्टर बीनवरून नाचक्की झाल्यानंतरची सारवासारव जास्त होती. पाकिस्तानचे पंतप्रधान आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, ‘आमच्याकडे खरा मिस्टर बीन नसेलही मात्र आमच्याकडे खरे क्रिकेटिंग स्पिरीट आहे. आम्हा पाकिस्तानींची एक सवय आहे आम्ही जोरदार बाऊन्स बॅक करतो. अध्यक्ष महोदय तुमचा संघ आज जिंकला त्याबद्दल तुमचे अभिनंदन.’

    सगळ्याची सुरुवातीला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या ट्विटने होते. मंगळवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) एक ट्विट केले. यामध्ये झिम्बाब्वेसोबतच्या सामन्यापूर्वी संघाच्या सराव सत्रातील काही छायाचित्रे शेअर केली होती. या ट्विटला उत्तर देताना Ngugi Chasura नावाच्या एका ट्विटर यूजरने लिहिले की, ‘झिम्बाब्वेचे नागरिक म्हणून आम्ही तुम्हाला कधीही माफ करणार नाही. एकदा तुम्ही खऱ्या मिस्टर बीन ऐवजी बनावट पाक बीन दाखवला होता. याबद्दल उद्या मैदानावर पाहूण घेऊ. उद्या पाऊस तुम्हाला वाचवेल अशी प्रार्थना करा.’