क्रिकेटसोबत शिक्षणही तितकंच महत्वाचं आहे- जितेश शर्मा

हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंती दिवशी २९ ऑगस्ट रोजी भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. हा दिवस १९२८, १९३२ आणि १९३६ मध्ये भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारे हॉकीपटू मेजर ध्यानचंद सिंग यांचा वाढदिवस आहे. या दिनाच्या निमित्ताने क्रिकेटर जितेश शर्माने नवराष्ट्र प्रतिनिधीसोबत संवाद साधला. त्या गप्पांचा हा सारांश.

    क्रिकेटने मला निवडलंय

    राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या दिवशी क्रीडा क्षेत्रातील लोकांना महत्व मिळतं आणि या दिवशी खेळण्यासाठी एक वेगळं प्रोत्साहन देखील मिळतं. मी क्रिकेटला निवडलं नाही, क्रिकेटने मला निवडलंय अस मी म्हणेल. याआधी मी फुटबॉल खेळायचो आणि माझं कुटुंब डिफेन्समध्ये असल्यामुळे मलासुद्धा डिफेन्समध्ये जाण्याची इचछा होती. स्पेसिफिकली मला एअर फोर्स मध्ये जायचं होतं, पण कधी कधी नशिबात काहीतरी वेगळं लिहिलेल असतं. मला डिफेन्समध्ये जाण्यासाठी चार टक्के जास्त हवे होते म्हणून मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. माझ्या शाळेतील टीम नेहमी राज्यस्तरावर खेळायची. तर क्रिकेट खेळण्याचं हे एक कारण होतं. मग मी त्यानुसार क्रिकेटमध्ये पुढे खेळत गेलो.

    मी क्रिकेट खेळत असताना अमरावती जिल्ह्यात विकेटकीपर पाहिजे होता आणि त्याच वेळेस माझ्या सरांनी मला खेळण्यासाठी संधी दिली आणि मी त्याच वर्षी जिल्हास्तरावर आणि अंडर 16 मध्ये बीसीसीआय कडून राज्यस्तरावर क्रिकेट खेळलो. त्यांनतर अंडर 19 मध्ये खेळलो आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशनमध्ये असताना कॅप्टन्सी केली.

    मी कधीच डिप्रेशन मध्ये गेलो नाही

    या क्षेत्रामध्ये मी बऱ्याच लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो. सगळेच खूप मेहनत करून तिथपर्यंत पोहोचले आहेत. प्रत्येकाकडून मला काहीतरी नवीन शिकायला मिळतं. प्रत्येकामध्ये वेगवेगळी क्वालिटी आहे आणि मी प्रत्येकापासून शिकण्याचा प्रयत्न करतो. क्रिकेट मध्ये मी तीन वर्षे चांगला खेळू शकलो नव्हतो म्हणून माझ्यासाठी तो काळ थोडा कठीण होता पण मी कधीच डिप्रेशन मध्ये गेलो नाही. माझ्या घरच्यांनी मला नेहमीच खूप सपोर्ट केला.

    यावर्षीचा आयपीएलमधला अनुभव खूप चमत्कारिक ठरला

    माझा यावर्षीचाआयपीएलमधला अनुभव खूप चमत्कारिक होता. मला आयपीएलपूर्वी कोणी ओळखत नव्हतं. माझा खेळ कोणी बघितला नव्हता. मला संधी दिल्याबद्दल मी अनिल सरांचे मनापासून आभार मानतो आणि मला पंजाब किंग्सकडून खूप शिकायला मिळाले. मला अनिल सर आणि पंजाब किंग्सचे कर्णधार मयंक अग्रवालकडून खूप मार्गदर्शन मिळाले. ते मला म्हणाले की, तू जास्त प्रेशर घेऊ नकोस, तू तुझ्या पद्धतीने खेळ अशाप्रकारे ते मला खूप सपोर्ट करायचे.

    एक व्यक्ती म्हणून मी पुढे कसा जाणार…

    मी माझ्या फिटनेसवर, कौशल्यावर, आणि आहारावर खूप लक्ष देतो. तसेच मी माझ्या मानसिक आरोग्याची देखील तितकीच काळजी घेतो. मी वर्तमान काळात जगणारी व्यक्ती आहे. मी भूतकाळात जास्त रमत नाही. मी कोणाशी कधीच स्पर्धा करत नाही. एक व्यक्ती म्हणून मी पुढे कसा जाणार याचा नेहमी सकारात्मक विचार करतो. सेल्फ फोकस करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो आणि मी खूप धार्मिक असल्यामुळे नेहमी देवाचं नामस्मरण करतो.

    क्रिकेटसोबत शिक्षणही तितकंच महत्वाचं आहे

    क्रिकेट माझ्यासाठी असं माध्यम आहे जिथे मी मनमोकळेपणाने व्यक्त होऊ शकतो. मी इतरांसमोर खूप हसमुख आणि शांत जरी असलो तरी मी ग्राउंड मध्ये माझा राग, आनंद आणि बऱ्याच गोष्टी व्यक्त करू शकतो. ज्यांना क्रिकेट क्षेत्रात यायचं आहे त्यांनी क्रिकेट कडे करिअर म्हणून न बघता आनंदाने खेळावं असं मला वाटतं. तसेच क्रिकेटसोबत शिक्षणही तितकंच महत्वाचं आहे. कारण शिक्षणामुळे तुम्ही स्वतःला वेगळ्या ऊंचीवर नेऊ शकता. त्यातून आपलं ज्ञान वाढतं. आयुष्यामध्ये समतोल राखला येतो. अंधश्रद्धा- श्रद्धा नक्की काय आहे हे आपल्याला शिक्षणामुळे कळतं.

    आनंदी राहण्याचा मंत्रा

    आनंदी राहण्याचा माझा एकच मंत्रा आहे, ज्या गोष्टी माझ्या कंट्रोल मध्ये आहे त्यावरचं मी लक्ष्य देतो आणि ज्या गोष्टी माझ्या कंट्रोल मध्ये नाहीये त्यावर मी लक्ष देत नाही. ज्या गोष्टीतून मला आनंद मिळतो त्या गोष्टींवर मी फोकस करतो.