
नवी दिल्ली : महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी क्रिकेटपटू अमोल मुजूमदार यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) एक्सवर पोस्ट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडून त्यांची निवड
सुलक्षणा नाईल, अशोक मल्होत्रा आणि जतिन परांजपे यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने मुख्य कोच म्हणून अमोज मुजूमदार यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानंतर भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडून त्यांची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने यासंदर्भातील घोषणा आज केली.
आपल्या क्रिकेट करियरमध्ये प्रथम श्रेणी सामने
अमोल मुजूमदार यांनी आपल्या क्रिकेट करियरमध्ये प्रथम श्रेणी सामने खेळताना प्रभावी कामगिरी केली आहे. त्यांनी १७१ सामने खेळताना ३० शतके आणि ११ हजारपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्यांनी १०० पेक्षा अधिक लिस्ट ए गेम्स आणि १४ टी-२० सामान्यांमध्ये खेळी केली आहे. त्यांनी मुंबईकडून खेळताना अनेक रणजी ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्यांनी आंध्र प्रदेश आणि आसामचे प्रतिनिधित्व देखील केले आहे.
मुजूमदार यांची प्रतिक्रिया
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर मुजूमदार यांनी प्रतिक्रिया दिली. महिला क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याचा खूप आनंद होत आहे. सीएसी आणि बीसीसीआयने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबाबत मी त्यांचे धन्यवाद मानतो. ही एक मोठी जबाबदारी आहे. पण, प्रतिभाशाली खेळाडूंसोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. पुढील दोन वर्ष खूप महत्त्वाचे आहेत, कारण यादरम्यान दोन विश्वकप होणार आहेत, असं ते म्हणाले.