टी २० विश्वचषकासाठी ‘अमूल’ कंपनी करतेय आयर्लंड संघाला स्पॉन्सर

    दिल्ली : १६ ऑक्टोबर पासून ऑस्ट्रेलियात टी २० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या विश्वचषकात एकूण १६ संघ सहभागी होणार असून या स्पर्धेत ४५ सामने खेळवले जाणार आहेत. यासाठी सध्या सर्व संघ कसून तयारी करीत असून बहुतांश देशांच्या क्रिकेट संघानी विश्वचषकासाठी नवीन जर्सी लाँच केल्या आहेत. या विश्वचषकाकरीता आयर्लंड संघाने देखील आपली जर्सी लाँच केली असून त्यावर एका भारतातील प्रसिद्ध कंपनीचे नाव छापलेले आहे. ‘अमूल’ ही भारतीय कंपनी यंदाच्या विश्वचषकासाठी आयर्लंड संघाची अधिकृत प्रायोजक आहे.

    ‘अमूल’नं आयर्लंड क्रिकेट बोर्डाशी तसा करार केला आहे. त्यामुळे आयर्लंड खेळाडूंच्या जर्सीवर आता ‘अमूल’चा लोगो ठळकपणे दिसणार आहे.

    भारतीय कंपनी अमूल ही डेअरी उत्पादक कंपन्यांमध्ये जगातली नववी सर्वात मोठी कंपनी आहे. तर भारतातली सर्वात मोठी फूड कंपनी आहे. याआधी अमूलनं २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकन संघाची स्पॉन्सरशिप घेतली होती. तर त्याआधी अमूल न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान संघाचेही ऑफिशियल स्पॉन्सर राहिले आहेत.