लखनौ सुपर जायंट्स संघाच्या कर्णधार पदाच्या सर्व अफवांवर पूर्णविराम!

केएल कर्णधारपद सोडणार असून उर्वरित सामन्यांसाठी निकोलस पूरनकडे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते, असा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता.

    केएल राहुल : इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या (Indian Premier League 2024) या हंगामाची प्लेऑफची शर्यत फारच रंगतदार सुरु आहे. 8 मे रोजी लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यामध्ये लढत पाहायला मिळाली. या सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या संघाने लखनौ सुपर जायंट्सला 10 विकेट्सने पराभव केले. या सामन्यानंतर संजीव गोएंका वादानंतर केएल राहुलच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात होते. केएल कर्णधारपद सोडणार असून उर्वरित सामन्यांसाठी निकोलस पूरनकडे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते, असा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता.

    याचसंदर्भात एक अपडेट आली आहे आणि या सर्व अफवांवर आता पूर्णविराम दिला आहे. संघाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या ते कर्णधाराला हटवण्याचा अजिबात विचार करत नाहीत. तो म्हणतो की, संघाचे लक्ष सध्या प्लेऑफमध्ये जाण्यावर आहे. आम्ही आमच्या कर्णधाराला पद सोडण्यास का सांगू आणि तसे करण्याची काय गरज आहे? आम्ही आमच्या पुढच्या सामन्याचा विचार करत आहोत. कर्णधार बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”

    आयपीएल 2024 च्या गुणतालिकेचा विचार करता सध्या लखनौ सुपर जायंट्स 12 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. लखनौच्या संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवणे कठीण जात आहे. या 12 सामन्यांमध्ये लखनौला 6 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले, तर 6 सामन्यात विजय मिळवला. -0.769 च्या निव्वळ रन रेटसह, लखनौ सुपर जायंट्सचे 12 गुण आहेत आणि ते पॉइंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहेत. 14 मे रोजी IPL 2024 च्या 64 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमच्या होम ग्राउंडवर होणार आहे. यानंतर लखनौचा शेवटचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध 17 मे रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.