शमीनंतर भारताला अजून एक धक्का; ‘हा’ खेळाडू झाला दुखापतग्रस्थ

    भारतीय क्रिकेटपटूंच्या दुखापतीची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही. अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला कोरोनाची लागण होऊन तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेला मुकणार आहे. तर आता मोहम्मद शमीनंतर भारताचा युवा गोलंदाज नवदीप सैनी (Navdeep saini) यालाही दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तो न्यूझीलंड (New Zealand)आणि भारत (India) ‘अ’ संघाच्या सामन्यांना मुकणार आहे. भारताचा ‘अ’ संघ न्यूझीलंडच्या ‘अ’ संघाशी २२ ते २७ सप्टेंबर दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सामना खेळणार आहे.

    नवदीप सैनीच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयनं अधिकृत ट्वीट केलं आहे. सैनीबद्दल माहिती देण्यात आली असून त्यांच्या माहिती नुसार, नॉर्थ झोन आणि साऊथ झोन यांच्यातील दुलीप करंडकमधील उपांत्य फेरीच्या सामन्याच्या पहिल्या दिवशी सैनीला दुखापत झाली. त्याच्या उजव्या मांडीला दुखापत झाल्यामुळे तो उर्वरीत स्पर्धेतून तसंच भारत आणि न्यूझीलंड ‘अ’ संघातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर पडला आहे. सैनी आता त्याच्या उपचारासाठी नॅशनल क्रिकेट अकादमी अर्थात NCA ला जाणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. तसंच रिषी धवन हा सैनीच्या जागी न्यूझीलंडविरुद्ध संघात असणार आहे.

    सैनी बाहेर गेल्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध सामन्यांसाठी भारत ‘अ’ संघ :

    पृथ्वी शॉ, अभिमन्यू ईस्वरन, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार, संजू सॅमसन (कर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, शाहबाज अहमद, राहुल चाहर, तिलक वर्मा, कुलदीप सेन, शार्दूल ठाकूर, उम्रान मलिक, राज अंगद बावा, रिषी धवन.