भारतीय पुरुष हॉकी संघाची दमदार कामगिरी, पाकिस्तानच्या संघाला फायनलमध्ये पराभूत करून विजेतेपद भारताच्या नावावर

खेळ पेनल्टी शूट आऊटच्या दिशेने गेला, जिथे भारताने २-० ने विजय मिळवला.

    आशिया चषक : सध्या आशिया चषक सुरु आहे आणि भारतीय पुरुष हॉकी संघाने दमदार कामगिरी करून अंतिम फेरीमध्ये पाकिस्तान हॉकी संघाचा पराभव करून विजेतेपद पटकवले आहे. भारताच्या संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये २-० असा विजय मिळवला आहे. पूर्ण वेळ संपल्यानंतर सामना ४-४ असा बरोबरीत संपला त्यामुळे निकालासाठी पेनल्टी शूटआऊटचा सहारा घ्यावा लागला. एकीकडे भारतीय क्रिकेट संघ शनिवारी पाकिस्तानविरुद्ध फ्लॉप ठरला असतानाच हॉकी संघाने बाजी मारली. शूटआऊटमध्ये भारताकडून मनिंदर सिंग आणि गुरज्योत सिंग यांनी गोल केले. त्याचवेळी भारताचा यष्टीरक्षक सुरज कारकेराने पाकिस्तानच्या अर्शद लियाकत आणि मोहम्मद मुर्तझा यांना शूटआऊटमध्ये गोल करण्यापासून रोखले.

    भारताच्या संघाकडून मोहम्मद राहिलने पूर्णवेळ दोन गोल केले. याशिवाय जुगराज सिंग आणि मनिंदर सिंग यांनी १-१ गोल केला. राहिलने १९व्या आणि २६व्या मिनिटाला संघासाठी गोल केले. त्याचवेळी जुगराज सिंगने ७व्या मिनिटाला आणि मनिंदर सिंगने १०व्या मिनिटाला गोल केला. दुसरीकडे अब्दुल रहमान, झिकारिया हयात, अर्शद लियाकत आणि कर्णधार अब्दुल राणा यांनी पूर्णवेळ १-१ गोल करत पाकिस्तानला ४-४ अशी बरोबरी साधून दिली. यानंतर खेळ पेनल्टी शूट आऊटच्या दिशेने गेला, जिथे भारताने २-० ने विजय मिळवला.

    यापूर्वी भारताच्या संघाला एलिट पूल स्टेजमध्ये पाकिस्तानविरुद्ध ४-५ असा पराभव पत्करावा लागला होता. त्याचवेळी पंतप्रधानांनी अंतिम सामन्यातील भारताच्या या विजयाबद्दल अभिनंदनही केले. नरेंद्र मोदींच्या ट्विटर हँडलने ट्विट केले की, “हॉकी 5S आशिया कपमधील चॅम्पियन्स!!” पुढे लिहिले होते, “पुरुष हॉकी संघाचे शानदार विजयाबद्दल अभिनंदन. आमच्या खेळाडूंच्या अतूट समर्पणाची ही साक्ष आहे आणि या विजयासह आम्ही पुढील वर्षी ओमानमध्ये होणाऱ्या हॉकी ५ विश्वचषकात आमचे स्थान निश्चित केले आहे. आपल्या खेळाडूंचे धैर्य आणि दृढनिश्चय आपल्या देशाला प्रेरणा देते.