
Asian Games 2023 : आज १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेचा पराभव करीत सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे. 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. याआधी भारताने नेमबाजीत पहिले सुवर्ण जिंकले होते.
श्रीलंकेसमोर 117 धावांचे लक्ष्य
सुवर्णपदकाच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेसमोर 117 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने 20 षटकांत सात गडी गमावून 116 धावा केल्या. स्मृती मंधानाने सर्वाधिक 46 धावांची खेळी खेळली. तर जेमिमा रॉड्रिग्जने 42 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 97 धावाच करू शकला. अशा प्रकारे टीम इंडियाने अंतिम सामना 19 धावांनी जिंकला.
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात क्रिकेटचा समावेश
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात क्रिकेटचा समावेश होण्याची ही तिसरी वेळ होती. यापूर्वी, दोन वेळा क्रिकेट या खेळांचा भाग झाला तेव्हा भारताने त्यात भाग घेतला नव्हता. म्हणजे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत पहिल्यांदाच क्रिकेट खेळत आहे. त्यामुळेच चीनच्या भूमीवर भारतीय मुलींनी क्रिकेटमध्ये इतिहास रचला असे आम्ही म्हणत आहोत.
Indian Womens Cricket Team Clinch Historic Gold Medal
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला 16 धावांवर शेफाली वर्माच्या रूपाने पहिला धक्का बसला. यानंतर मंधाना आणि रॉड्रिग्समध्ये दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
सर्वाधिक धावा करणाऱ्या मंधानाने 45 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 46 धावा केल्या. रॉड्रिग्सने 40 चेंडूत 42 धावा केल्या, ज्यात त्याने 5 चौकार मारले. या दोघांशिवाय दुसरी कोणतीही खेळाडू आपली छाप सोडू शकली नाही. त्यामुळे भारतीय महिला संघाने निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 116 धावा केल्या.
श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाच्या इनोका रणवीरा, सुगंधिका कुमारी आणि उदेशिका प्रबोधिनीने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
श्रीलंकेच्या संघाकडून दमदार सुरुवात
भारताने दिलेल्या 117 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाने दमदार सुरुवात केली. पण, त्याची सुरुवात लवकरच भारतीय गोलंदाजांनी रोखली. श्रीलंकेच्या विकेट्स नियमित अंतराने पडत राहिल्या, परिणामी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. श्रीलंकेचा संघ 20 षटकांत 8 विकेट गमावून केवळ 97 धावा करू शकला आणि सामना 19 धावांनी गमावला.