भारताने आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सातव्या दिवशी रौप्य पदकाने केली सुरुवात, रोहन बोपण्णा आणि रुतुजा भोसले खेळणार टेनिसचा फायनाचा सामना

सुवर्ण पदकाचा सामना सुरू झाला त्यावेळी भारताची जोडी सरबजोत सिंह आणि दिव्या यांनी ४ गुणांची आघाडी घेतली होती. त्यानंतर त्यांनी चीनविरूद्ध ही आघाडी ७ - ५ अशी नेली.

    आशियाई क्रीडा २०२३ : सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. भारताने आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये २०२३ च्या सातव्या दिवशी रौप्य पदकाने सुरुवात केली आहे. भारताच्या १० मीटर एअर पिस्टल मिश्र दुहेरी संघाने भारताला 13 वे रौप्य पदक पटकावून दिले. या संघात सरबजोत सिंग आणि दिव्या यांचा सामावेश होता. सुवर्ण पदकाच्या सामन्यात त्यांना चीनच्या जोडीला पराभूत करता आले नाही. सरबजोत आणि दिव्याने १४ गुण मिळवले तर चीनच्या संघाने १६ गुण मिळवले.

    सुवर्ण पदकाचा सामना सुरू झाला त्यावेळी भारताची जोडी सरबजोत सिंह आणि दिव्या यांनी ४ गुणांची आघाडी घेतली होती. त्यानंतर त्यांनी चीनविरूद्ध ही आघाडी ७ – ५ अशी नेली. मात्र मायदेशात खेळणाऱ्या चीनच्या जोडीने ही पिछाडी भरून काढत भारताला कडवी झुंज दिली अखेर त्यांनी अटीतटीचा झालेला सामना १६ – १४ असा जिंकत सुवर्ण पदकावर कब्जा केला. भारतीय नेमबाजांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

    या रौप्य पदकानंतर भारताने आपली पदक संख्या ही ३४ वर नेली आहे. भारताने आतापर्यंत ८ सुवर्ण १३ रौप्य आणि १३ कांस्य पदके अशी एकूण ३४ पदके जिंकली आहेत. ते सध्या पदक तालिकेत चौथ्या स्थानावर आहेत. भारतीय बॅडमिंटन संघ अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी कोरियाशी भिडणार आहे, तर रोहन बोपण्णा टेनिसमध्ये रुतुजा भोसलेसह मिश्र दुहेरीच्या सुवर्णपदकावर लक्ष ठेवून त्याच्या कारकिर्दीत आणखी एक पहिली भर घालणार आहे.