शेवटच्या क्षणी रोहितने ऋषभला डावलून कार्तिकला दिली संधी; स्वतः रोहितने केला खुलासा

    नागपूर : शुक्रवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) या दोन संघात सुरु असलेल्या मालिकेचा दुसरा सामना नागपूर येथे खेळण्यात आला. या सामन्यात भारताने ६ विकेट्सने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. मात्र यासामन्याच्या शेवटच्या क्षणी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) ऋषभ पंतला(Rushabh Pant)  डावलून दिनेश कार्तिकला संधी दिली. कर्णधार रोहितच्या या निर्णयाची सध्या सर्वत्रच चर्चा सुरु झाली आहे.

    पावसामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना हा ८-८ षटकांचा खेळण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलयाने भारतासमोर ९० धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारतानं चार चेंडू राखून ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. अखेरच्या क्षणी आलेल्या कार्तिकने अवघ्या २ चेंडूत १० धावांची तुफानी खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. महत्वाचं म्हणजे, कार्तिकपूर्वी संघ ऋषभ पंतला फलंदाजीसाठी पाठवण्याच्या विचारात होता. परंतु, अखेरच्या क्षणी रोहित शर्मानं निर्णय बदलला आणि कार्तिकला फलंदाजीसाठी बोलावलं. याचा खुलासा खुद्द कर्णधार रोहित शर्मानेच सामन्यानंतर केला आहे.

    काय म्हणाला रोहित शर्मा?
    ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयानंतर रोहित शर्मा म्हणाला की, “आम्ही ऋषभ पंतला पाठवता येईल का याचा विचार करत होतो, पण मला वाटले की सॅम्स शेवटचे ओव्हर टाकेल आणि तो फक्त ऑफ कटर टाकेल, म्हणून मला वाटलं की डीकेला येऊ द्या. असाही दिनेश कार्तिक संघासाठी फिनिशरची भूमिका बजावत आहे.”