आशियाई क्रीडा स्पर्धेत अविनाश साबळेचा डबल धमाका; गोल्डनंतर आता सिल्व्हर मेडल

Avinash Sable Win 2nd Medal In Asian Games 2023 : महाराष्ट्राच्या लेकाने चीनमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अविनाशने भारतासाठी एशियन गेम्स स्पर्धेत दुसरं पदक जिंकलं आहे.

    होंगझोऊ : एशियन गेम्स 2023 स्पर्धेत टीम इंडियाच्या खेळाडूंची धमाकेदार कामगिरी सुरुच आहे. भालाफेकपटू गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने गोल्ड मेडल पटकावलंय. तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या सुपुत्राने डबल धमाका केलाय. अविनाश साबळे याने फक्त 3 दिवसांमध्ये दुसरं पदक मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अविनाशने बुधवारी मेन्स 5 हजार मीटर स्पर्धेत सिलव्हर मेडल पटकावलं आहे. अविनाशने केलेल्या या कामगिरीसाठी त्याचं सोशल मीडियावर भरभरुन कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे.

    रौप्य पदक जिंकलं
    अविनाशने 5 हजार मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकलं आहे. अविनाशने 5 हजार मीटरचं अंतर हे 13:21:09 इतक्या वेळेत पार केलं. तर बहरीनचा यमाताव याने 5 हजार मीटरचं अंतर हे 13:17:40 इतक्या वेळेत पूर्ण केलं. अविनाशने भारताला या क्रीडा प्रकारात तब्बल 41 वर्षानंतर पदक मिळवून दिलंय. भारताने या प्रकारातील अखेरचं पदक हे 1982 साली जिंकलं होतं. त्यानंतर आता अविनाशने भारतासाठी नेत्रदीपक कामगिरी करत 41 वर्षांची प्रतिक्षा अखेर संपवली.
    अविनाशची गोल्डन कामगिरी
    दरम्यान अविनाशने काही तासांआधी 2 ऑक्टोबर रोजी भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं. अविनाशने भारताला 3 हजार मीटर स्टीपलचेजमध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं. अविनाशचं आणि भारताचं हे एथलेटिक्समधील पहिलं आणि एकमेव गोल्डन मेडल ठरलं होतं. अविनाशने 3 हजार मीटरचं हे अंतर फक्त 8:19:50 इतक्या वेळात पूर्ण केलं होतं.