झिम्बाब्वेमध्ये गेलेल्या भारतीय खेळाडूंसमोर अंघोळीची समस्या

    १८ ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या झिम्बाब्वे विरुद्ध भारत या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला आहे. मात्र त्या ठिकाणी भारतीय खेळाडूंसमोर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. अनेक तास मैदानावर सराव करणाऱ्या खेळाडूंना सरावानंतर अंघोळ करण्यावर काही निर्बंध घालण्यात आल्यामुळे ही बाब खेळाडूंसाठी डोके दुखी ठरत आहे.

    सध्या झिम्बाब्वेच्या हरारेमध्ये जलसंकट सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून राजधानी हरारेतील अनेक भागात गेल्या तीन दिवसांपासून पाणी येत नाही. पिण्याच्या पाण्यासाठीही नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. पाण्याचे गंभीर संकट असताना अशा परिस्थितीत बीसीसीआयने टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल आणि इतर खेळाडूंना पाण्याची जास्तीत जास्त बचत करण्यास आणि आंघोळीसाठी कमी पाणी वापरण्यास सांगितले आहे.

    २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघाला अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर केपटाऊनच्या अनेक भागात पाण्याचे संकट निर्माण झाले. त्यानंतरही बीसीसीआयने खेळाडूंना कमीत कमी पाणी वापरण्यास सांगितले होते. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, होय हरारेमध्ये पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. खेळाडूंना माहिती देण्यात आली आहे. कमीत कमी वेळेत आंघोळ करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय पाणी बचतीसाठी संघाच्या पूल सत्रात कपात करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

    झिम्बाब्वेची राजधानी असलेल्या हरारेला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. तीन वर्षांपूर्वी येथील परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, लोकांना सांडपाणीही वापरावे लागत होते.