बेल्जियमचा कॅनडावर १-० ने निसटता विजय

    फिफा विश्वचषक स्पर्धेत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बेल्जियमने यंदाच्या फिफा विश्वचषकात विजयी सुरुवात केली आहे. बेल्जियमने कॅनडावर १-० ने निसटता विजय मिळवला आहे. या सामन्यात गोलकिपर थिबॉट कोर्टोइसनं कॅनडाचा पेनल्टी किकवर गोल करण्याचा प्रयत्न अयशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली तर, बत्सुईनं एक गोल डागत संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे बेल्जियमच्या विजयाचं सर्व श्रेय मिची बत्सुई आणि गोलकिपर थिबॉट कोर्टोइस या दोन दिग्गज फुटबॉलर्सना दिल जात आहे.

    अहमद बिन अली स्टेडियमवर बुधवारी रात्री हा सामना रंगला होता. फर्स्ट हाफमध्ये दोन्ही संघ आक्रमक दिसून आले. ३६ वर्षांनंतर विश्वचषक खेळण्यासाठी आलेला कॅनडाचा संघ सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करत होता. फर्स्ट हाफमध्ये एकूण १४ शॉर्ट्स घेतले, पण गोल डागण्यात यशस्वी झाले नाहीत. याचदरम्यान, सामन्याच्या दहाव्या मिनिटाला कॅनडाकडे गोल डागण्याची सुवर्णसंधी आली. पण तिथेही कॅनडाच्या पदरी निराशाच आली.

    कॅनडाच्या अल्फोन्सो डेव्हिसनं गोल डागण्याचा उत्तम प्रयत्न केला खरा, पण बेल्जियमच्या गोलकिपर थिबॉट कोर्टोइसनं अल्फोन्सो डेव्हिसची पेनल्टी किक उत्तमरित्या वाचवली अन् कॅनडाची गोल डागण्याची संधी हुकली. त्यानंतर बेल्जियमचा फॉरवर्ड खेळाडू मिची बत्सुईनं सामन्याच्या ४४ व्या मिनिटाला गोल डागला. या गोलमुळे बेल्जियमनं सामन्यात १-० अशी आघाडी सामन्याच्या सेकंड हाफमध्ये दोन्ही संघांना एकही गोल डागता आला नाही. या हाफमध्ये कॅनडाला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या. पण बेल्जियमचा गोलकिपर कोर्टोइसच्या बचावापुढे कॅनडाचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि अखेर बेल्जियमनं सामना जिंकत स्पर्धेत तीन गुण मिळवले आहेत.