Bishan Singh Bedi
Bishan Singh Bedi

    Bishan Singh Bedi : भारताचे माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचे निधन झाले आहे. ते 77 वर्षांचे होते. त्यांनी भारतासाठी एकूण 77 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यांनी 273 विकेट्स घेतल्या होत्या. बेदी हे भारतातील एक सर्वोत्तम लेफ्ट आर्म स्पिनर होते.
    बिशन सिंग बेदी यांनी 22 कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व देखील केलं होतं. बेदी हे 1967 ते 1979 पर्यंत क्रिकेटच्या मैदानात सक्रीय होते. त्यात त्यांनी भारताकडून 67 कसोटी सामने खेळले आणि 266 विकेट्स घेतल्या. त्यांनी भारताकडून 10 वनडे सामने देखील खेळले होते. त्यात त्यांनी 7 विकेट्स घेतल्या.

    भारतीय फिरकीचा पाया रचण्यासाठी ओळखले

    बिशन सिंग बेदींना भारतीय फिरकीचा पाया रचण्यासाठी आळखलं जातं. त्यांच्या जोडीने इरापल्ली प्रसन्ना, बीएस चंद्रशेखर आणि एस व्यंकटराघवन यांनी एका काळ गाजवला. या फिरकीपटूंनी भारताच्या पहिल्या वनडे विजयात महत्वाची भुमिका बजावली होती. 1975 च्या वर्ल्डकपमध्ये बेदींनी इस्ट आफ्रिकेविरूद्ध भेदक मारा करत त्यांना 120 धावात रोखले होते.
    देशांतर्गत क्रिकेटमध्ये बेदी हे मुख्यत्वे दिल्लीच्या संघाकडून खेळले. निवृत्तीनंतर त्यांनी प्रशिक्षक आणि मेंटॉरची भुमिका देखील बजावली. त्यांनी समालोचक म्हणून काही काळ भुमिका निभावली.

    स्पष्टवक्तेपणाबद्दल देखील प्रसिद्ध

    बिशन सिंग बेदी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल देखील प्रसिद्ध होते. ते कोणत्याही विषयावर कोणचीही भीड न ठेवता आपले मतप्रदर्शन करत असत.