चोप्रा पुन्हा इतिहास रचण्यासाठी सज्ज; गुरूवारी डायमंड लीगची फायनल

    भारताचा ऑलिम्पिक (Olyampic) सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा (Niraj Chopra) पुन्हा एकदा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. तो गुरूवारी सुरू होणाऱ्या प्रतिष्ठित डायमंड लीग फायनल्सचा प्रबळ दावेदार असून दुखापतीतून सावरत तो पुन्हा मैदानावर पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे.

    नीरज चोप्रा लुसाने मध्ये डायमंड लीग (Diamond League) जिंकणारा पहिला भारतीय भालाफेकपटू ठरला होता. दरम्यान, नीरजने जुलै महिन्यात अमेरिकेतील जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. मात्र याचस्पर्धेतदरम्यान त्याला ग्रॉईन इन्जुरी झाली होती. त्यामुळे त्याला बर्मिंगहममधील राष्ट्रकुल स्पर्धेला मुकावे लागले होते.

    नीरज चोप्रा बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेला दुखापतीमुळे मुकला होता. मात्र आता तो दुखापतीतून सावरला असून डायमंड लीगमध्ये जोरदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो जवळपास एक महिना दुखापतीमुळे मैदानापासून दूर होता.

    २४ वर्षाच्या नीरज चोप्राने या दुखापतीतून सावरत २६ जुलैला झालेल्या लुसानेमध्ये पहिल्या प्रयत्नातच ८९.०८ मीटर भालाफेक करत टायटल आपल्या नावावर केले होते. त्यावेळी नीरजवर दुखापतीचा काही परिणाम झालाय असे वाटत नव्हते. नीरज चोप्रा २०१७ आणि २०१८ मध्ये डायमंड लीग फायनल्ससाठी पात्र झाला होता. तो २०१७ ला सातव्या तर २०१८ मध्ये चौथ्या स्थानावर राहिला होता.

    डायमंड लीगच्या फायनल्समध्ये सहा खेळाडू असणार आहेत. यात वर्ल्ड चॅम्पियन अँडरसन पीटर्स खेळू शकणार नाही. तो अजून दुखापतीतून सावरलेला नाही. या स्पर्धेत नीरज चोप्राला चेक प्रजासत्ताकच्या याकूब वाडलेजकडून कडवी टक्कर मिळू शकते. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पकद जिंकले होते. मात्र नीरज चोप्राने त्याला लुसानेमध्ये देखील त्याला मात दिली होती. त्यावेळी वाडलेजने ८५. ८८ मीटर भाला फेकला होता.