कॉस्टारिकाचा जपानवर १-० ने धमाकेदार विजय

कॉस्टारिकाचा स्पेनने पहिल्या लढतीत ७-० असा पराभव केला होता. तुलनेत त्यांनी रविवारी सुधारित खेळ केला. त्यामुळे जपानची आक्रमणे यशस्वी ठरली नाहीत. कॉस्टारिका संघाने जपानचा १-० ने पराभव केला. कोस्टारिकाच्या विजयानंतर आता ई गटात चुरस वाढली आहे.

    फिफा विश्वचषक स्पर्धेत (FIFA World Cup) रोमांचक सामन्यांची मालिका सुरूच आहे. मोरोक्को संघाने बेल्जियम संघाला धुळ चारल्यानंतर आता कॉस्टारिका संघाने जपानचा पराभव केला आहे.

    अहमद बिन अली स्टेडियमवर झालेल्या लढतीत फुलर याने ८१व्या मिनिटास गोल नोंदवून कॉस्टारिकाला आघाडी मिळवून दिली. गोलक्षेत्राच्या बाहेर त्याला सहकारी येल्तसिन तेदेडा याने चेंडू पास केला. कॉस्टारिकाच्या मध्यरक्षकाच्या डाव्या पायाचा फटका जपानचा गोलरक्षक शुईची गोन्दा याने अडविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. चेंडू त्याच्या बोटांना चाटून गोलनेटमध्ये गेला. कॉस्टारिकाचा हा सामन्यात लक्ष्याच्या दिशेने पहिलाच प्रयत्न होता. दोन सामन्यांत मिळून कॉस्टारिकाने पहिल्यांदाच शॉट ऑन टार्गेट मारला व त्यात यश प्राप्त केले.

    कॉस्टारिकाचा स्पेनने पहिल्या लढतीत ७-० असा पराभव केला होता. तुलनेत त्यांनी रविवारी सुधारित खेळ केला. त्यामुळे जपानची आक्रमणे यशस्वी ठरली नाहीत. उत्तरार्धात दोन वेळा जपानी संघाला गोलक्षेत्राबाहेरून फ्रीकिक फटका मिळाला; पण दोन्ही वेळेस फटक्यात भेदकता दिसली नाही. त्यामुळे पहिल्या लढतीत जर्मनीला २-१ फरकाने पराजित केलेल्या आशियाई संघाला यावेळी गोल नोंदविता आला नाही. जपानला सामन्यात पाच कॉर्नर्स मिळाले, तुलनेत कॉस्टारिकाला एकही कॉर्नर मिळाला नाही. कोस्टारिकाच्या विजयानंतर आता ई गटात चुरस वाढली आहे.