प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

    टीम इंडियात (Team India) रोहित (Rohit Sharma) आणि विराट (Virat Kohli) यांच्यात सुरू असलेला वाद आणखी जोर पकडत आहे. यावर केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर (Union Sports Minister Anurag Thakur) यांनी कोणाचेही नाव न घेता कडक संदेश दिला आहे. बुधवारी संसदेबाहेर प्रसारमाध्यमांनी त्यांना या वादावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘खेळापेक्षा कोणीही मोठा नसतो, खेळ सर्वोच्च असतो. खेळाडूंमध्ये काय चालले आहे ते मी सांगू शकत नाही. त्यांच्याशी संबंधित असोसिएशन किंवा संस्थेची ही जबाबदारी आहे. त्यांनी याबाबत माहिती देणे योग्य ठरेल.

    वास्तविक, दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी (South Africa Tour) रोहित आणि विराटमध्ये मतभेद (Dispute) झाल्याच्या बातम्या येत आहेत. एकदिवसीय आणि टी-२० संघाचा कर्णधार रोहित शर्मा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे या दौऱ्यातील कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने (BCCI) दुजोरा दिला आहे. आता या दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेतून कसोटी कर्णधार विराट कोहलीने माघार घेतल्याचे वृत्त आहे.

    विराट आज पत्रकार परिषद घेणार आहे

    विराट कोहली आज दुपारी १ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. यावेळी ते सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील असे सांगण्यात येत आहे. ते दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय मालिका खेळणार की नाही याबाबतची परिस्थितीही स्पष्ट करू शकतात.

    माजी कर्णधार अझरुद्दीनने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे

    भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने रोहित शर्माची दुखापत आणि विराट कोहलीच्या एकदिवसीय मालिकेतून अचानक ब्रेक घेण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अझहरने ट्विटरवर लिहिले की, ‘विराटने ब्रेक घेणे ठीक आहे, पण त्याच्या टायमिंगवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.’

     

    रोहित दुखापतीमुळे कसोटीतून बाहेर

    भारतीय संघ १६ डिसेंबरला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. कसोटी मालिकेत विराट कोहली संघाचे नेतृत्व करणार आहे. एकदिवसीय मालिका १९ जानेवारीपासून खेळवली जाणार आहे. कसोटी संघ जाहीर झाला आहे, तर एकदिवसीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही.

    दरम्यान, सोमवारी मुंबईत सराव सुरू असताना रोहितला दुखापत झाली. त्याच्या हाताला दुखापत झाली आहे. मात्र, एकदिवसीय मालिकेपर्यंत तो या दुखण्यातून बाहेर येण्याची अपेक्षा आहे. रोहितच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडण्याची घोषणा करत बीसीसीआयने त्याच्या जागी गुजरातचा फलंदाज प्रियांक पांचालचा समावेश केला आहे.