BCCI ने क्रिकेटपटूंच्या शुल्कात केली इतक्या रुपयांनी वाढ ; रक्कम ऐकून व्हाल हैराण

गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे रणजी ट्रॉफी सामने रद्द करण्यात आले होते. बोर्डाच्या सर्व खेळाडूंना या सामन्याच्या शुल्कातील ५० टक्के नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    नवी दिल्ली: राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या शुल्कात भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (बीसीसीआय) वाढ केली आहे. अपेक्स काऊंसिलच्या सोमवारी झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

    देशातंर्गत क्रिकेटमध्ये ४० पेक्षा जास्त सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या शुल्कात ६० हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. अंडर २३ क्रिकेटपटूंच्या शुल्कात २५ हजार रुपये तर अंडर १९ क्रिकेटपटूंच्या शुल्कात २० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे खेळाडूंना मागील हंगामाची नुकसान भरपाईही देण्यात येणार आहे.

    गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे रणजी ट्रॉफी सामने रद्द करण्यात आले होते. बोर्डाच्या सर्व खेळाडूंना या सामन्याच्या शुल्कातील ५० टक्के नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या रणजी ट्रॉफीतील खेळाडूंना प्रतीदिवसासाठी ३५ हजार तर प्रत्येक सामन्यासाठी १.४ लाख रुपये शुल्क देण्यात येते. त्याप्रमाणे खेळाडूंना ७० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.