दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला झटका : जडेजा, शुभमन, अक्षर आणि इशांत गंभीर जखमी, कसोटी मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता

अहवालानुसार हे चार खेळाडू तंदुरुस्त नाहीत (Not Fit). मुंबईत (Mumbai) खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही रवींद्र जडेजा आणि इशांत खेळले नाहीत. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जडेजाला लिगामेंट फाटण्याचा त्रास होत आहे. त्याचवेळी इशांतचे बोट निखळले आहे.

    मुंबई : २६ डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी (Test Cricket) लवकरच टीम इंडियाची (Team India) घोषणा होणार आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, संघाची घोषणा होण्यापूर्वी संघातील चार खेळाडूंच्या दुखापती गंभीर असल्याचे समोर आले आहे. जखमी खेळाडूंमध्ये इशांत शर्मा, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि शुभमन गिल यांचा समावेश आहे.

    अहवालानुसार हे चार खेळाडू तंदुरुस्त नाहीत (Not Fit). मुंबईत (Mumbai) खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही रवींद्र जडेजा आणि इशांत खेळले नाहीत. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जडेजाला लिगामेंट फाटण्याचा त्रास होत आहे. त्याचवेळी इशांतचे बोट निखळले आहे.

    मुंबई कसोटीपूर्वी जडेजाबाबत हे विधान आले होते

    मुंबई कसोटीपूर्वी बीसीसीआयने जडेजाबद्दल सांगितले होते, ‘कानपूरमधील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती. स्कॅन केल्यानंतर त्याच्या खांद्याला सूज असल्याचे आढळून आले. त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असून त्यामुळे तो मुंबईतील दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. दुसऱ्या कसोटीत जडेजाच्या जागी जयंत यादवला संधी मिळाली.

    शुभमन गिललाही झाली दुखापत

    टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिललाही दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणे कठीण जात आहे. गिलच्या पायाची दुखापत पुन्हा निर्माण झाल्याचे अहवालात म्हटले आहे. यापूर्वी भारताच्या इंग्लंड दौऱ्यात गिलला दुखापत झाली होती. त्यांना हा दौरा मध्येच सोडावा लागला. मुंबईत खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती.

    न्यूझीलंडविरुद्ध अक्षरची अप्रतिम कामगिरी

    अक्षर पटेलने न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ९ विकेट घेतल्या होत्या. एजाज पटेल आणि अश्विननंतर सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज ठरला. अक्षरने न्यूझीलंडविरुद्धही आपल्या बॅटची ताकद दाखवून दिली. मुंबई कसोटीतही त्याने पहिले अर्धशतक झळकावले. अशा परिस्थितीत हा खेळाडू संघाचा भाग नसेल तर भारतीय संघाला खूप नुकसान होईल.

    इशांत संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज

    इशांत शर्माने भारतासाठी १०० हून अधिक कसोटी सामने खेळले आहेत. तो संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. अशा परिस्थितीत जर इशांत संघाचा भाग नसेल तर संघाला त्याची नक्कीच उणीव भासेल. दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर स्विंग, वेग आणि बाउन्स आहेत. अशा परिस्थितीत इशांत संघासाठी खूप महत्त्वाचा ठरतो.

    जडेजाच्या जागी कोण?

    जडेजाची यंदाची कामगिरी अप्रतिम राहिली आहे. त्याने ७ सामन्यात २४.४५ च्या सरासरीने २६९ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर या खेळाडूने १६ विकेट्सही घेतल्या आहेत. गेल्या वर्षभरात या खेळाडूने तिन्ही फॉरमॅटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेत या खेळाडूची उणीव भासणार आहे.

    अक्षर आणि जडेजाच्या जागी शाहबाज नदीम आणि सौरभ कुमारची निवड केली जाऊ शकते. सौरभ कुमार सध्या भारत अ संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे.