पाकिस्तानी किक्रेट संघाला विराट नव्हे तर ‘या’ खेळाडूच्या आक्रमक खेळीची भीती सतावतेय

भारत आणि पाकिस्तानचा संघ दोन वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर भिडणार आहे.२०१९ मध्ये झालेल्या एक दिवसीय विश्वचषकामध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले हते. त्या लढतीत भारताने पाकिस्तानचा ८९ धावांनी दारुण पराभव केला होता.

    येत्या १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये होत असलेल्या (टी-२०)विश्वचषकात भारत व पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहे. २४ ऑक्टोबरला हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी भिडणार आहेत. आयसीसीचा हा विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार भारत आहे. तसेच पाकिस्तानविरुद्धही भारताचा रेकॉर्ड चांगला असून आतापर्यंत झालेल्या एकाही विश्वचषकामध्ये पाकिस्तानचा संघ भारताचा पराभव करू शकलेला नाही. यंदाही हा विक्रम कायम राखण्यासाठी विराटसेना मैदानात उतरेल.

    क्रिकेटच्या या महासंग्रामाला सुरुवात होण्यापूर्वी पाकिस्तानचे माजी खेळाडू मुदस्सर नजर यांनी भारताचे पारडे जड असल्याचे म्हटले आहे. तसेच पाकिस्तानच्या संघानेही गेल्या काही काळात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे हा सामना रोमांचक होईल असेही ते म्हणाले. तसेच पाकिस्तानला सर्वाधिक धोका कोणत्या खेळाडूकडून आहे हे देखील त्यांनी सांगितले. मुदस्सर नजर यांनी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि विस्फोटक फलंदाज रोहित शर्माबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

    ”विश्वचषकामध्ये पाकिस्तानच्या संघाला विराट कोहलीहून अधिक धोका रोहित शर्माकडून आहे. विश्वचषकामध्ये एखादा फलंदाज वेगाने धावा करू लागला किंवा एखादा गोलंदाज झटपट विकेट घेऊ लागला तर लढतीच्या निर्णयावर त्याचा परिणाम जाणवतोच.” नुकत्याच इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी मालिकेत भारताच्या कोणत्याच फलंदाजाने खास कामगिरी केली नाही असे दिसते. कर्णधार विराट कोहली हा संघासाठी सर्वाधिक धावा करण्यासाठी ओळखला जातो, मात्र त्यानेही गेल्या २ ते ३ वर्षात शतक झळकावलेले नाही. इंग्लंडविरुद्धही तो खास कामगिरी करू शकला नाही, मात्र रोहितने चांगली कामगिरी केली. विराटची कामगिरी घसरली आहे, त्यामुळे पाकिस्तानला रोहित शर्माकडून अधिक धोका आहे, असे मुदस्सर नजर म्हणाले.

    दरम्यान, विश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तानचा संघ २४ ऑक्टोबरला आमनेसामने येणार आहे. टी-२० विश्वचषकामध्ये भारताने आतापर्यंत पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले असून पाचपैकी पाच सामने आपल्या नावे केले आहेत. तसेच दोन्ही संघात गेल्या ९ वर्षात ८ टी-२० सामने खेळले गेले आहेत. यात भारताने ८ लढती जिंकल्या, तर पाकिस्तानला फक्त एक सामना जिंकला आला आहे.

    भारत आणि पाकिस्तानचा संघ दोन वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर भिडणार आहे. २०१९ मध्ये झालेल्या एक दिवसीय विश्वचषकामध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले हते. त्या लढतीत भारताने पाकिस्तानचा ८९ धावांनी दारुण पराभव केला होता.