ronaldo removes coca cola bottle

युरो कपमध्ये ( Euro 2020) हंगेरीविरुद्धच्या सामन्यानंतर पोर्तुगालचा कर्णधार असलेल्या रोनाल्डोने केलेल्या एका कृतीमुळे कोका कोला कंपनीचं (Coca Cola) कोट्यवधींचं नुकसान झालं आहे.

    फूटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोला (Cristiano Ronaldo) फॉलो करणारे अनेक जण आहेत.त्यामुळे रोनाल्डो मैदानाबाहेरही जे करत असतो त्याचे परिणाम लगेच दिसून येतात.

    युरो कपमध्ये ( Euro 2020) हंगेरीविरुद्धच्या सामन्यानंतर पोर्तुगालचा कर्णधार असलेल्या रोनाल्डोने केलेल्या एका कृतीमुळे कोका कोला कंपनीचं (Coca Cola) कोट्यवधींचं नुकसान झालं आहे.

    रोनाल्डो कायम आपल्या आरोग्याची काळजी घेतो. त्याचमुळे वयाच्या ३६ व्या वर्षीही तो फिट आहे. हंगेरीविरुद्धचा सामना संपल्यानंतर रोनाल्डो पत्रकार परिषदेसाठी येऊन बसला. त्याने कॅमेरासमोर असलेल्या कोका कोलाच्या बॉटल बाजूला केल्या आणि तिकडे स्वत: पाण्याच्या बॉटल ठेवल्या. कोका कोलाऐवजी पाणी प्या,असा संदेश त्याने आपल्या कृतीमधून दिला.

    कोका कोला युरो कपची स्पॉन्सर आहे. रोनाल्डोच्या या एका संदेशामुळे कंपनीची ब्रॅण्ड व्हॅल्यू ४ बिलियन युएस डॉलर म्हणजेच जवळपास २९३२३ कोटींनी कमी झाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार कोका कोला कंपनीचे ५६.१० डॉलर किंमतीचे शेअर ५५.२२ डॉलर झाले आहेत. रोनाल्डोच्या या कृतीमुळे कंपनीच्या शेअरची किंमत १.६ टक्क्यांनी पडली आहे. यामुळे कोका कोलाची ब्रॅण्ड व्हॅल्यू २४२ बिलियन डॉलरवरून २३८ बिलियन डॉलर झाली आहे.

    दरम्यान, रोनाल्डोच्या या कृतीवर कोका कोला कंपनीनेही प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाला आपल्याला काय प्यायचं हे ठरवण्याचा अधिकार आहे, कारण लोकांच्या आवडी आणि गरजा वेगळ्या असतात, असं कंपनीने सांगितलं आहे.

    क्रिस्टियानो रोनाल्डो हा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू आहे. सोशल मीडियावरही त्याचे कोट्यवधी चाहते आहेत. रोनाल्डोने कोका कोलाच्या बॉटल बाजूला ठेवल्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला, तसंच जगाच्या काना कोपऱ्यातून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला, ज्याचा फटका कंपनीच्या शेअरला बसला.