पाकिस्तानी खेळाडूला लोळवत दीपक पुनियाचा “सुवर्ण” विजय

    राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या (Commonwealth Games 2022) आठव्या दिवशी भारतीय कुस्तीपटूंनी क्रीडा विश्वात सुवर्ण मोहोर उमटवली आहे. सुवर्ण कामगिरी करणाऱ्यांमध्ये आता आर्मी मॅन असलेल्या दीपक पुनियाचा देखील समावेश झालेला आहे. कुस्तीपटू दीपक पुनियाने (Deepak Punia) ८६ किलो वजनी गटात पाकिस्तानच्या (Pakistan) मुहम्मद इनामला (Muhammad Inam) चितपट करत सुवर्णाला (Gold Medal) गवसणी घातली आहे.

    २३ वर्षाच्या दीपक पुनियाने इमानचा ३ – ० असा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. दीपकने ८६ किलो वजनी गटात पहिले दोन सामने १० – ० असे तांत्रिक गुणांवर सहज जिंकले होते. त्यानंतर सेमी फायनलमध्ये त्याला थोडा संघर्ष करावा लागला होता. मात्र अंतिम फेरीत त्याने आक्रमक खेळ करत पाकिस्तानच्या कुस्तीपटूला अक्षरश लोळवले. दीपक हा भारतीय लष्करात कार्यरत असून त्याची नायब सुभेदार ही रँक आहे.

    दीपक पुनियाने अनुभवी इनामच्या विरूद्ध पहिल्या फेरीच्या सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ केला. दीपकने इनामला रिंगच्या बाहेर ढकलत गुणांचे खाते उघडले. त्यानंतर पॅसिव्ह पॉईंटच्या जोरावर गुणांची संख्या २ वर नेली. पहिल्या फेरीत दीपक दोन गुणांनी आघाडीवर होता. त्याने पाकिस्तानच्या अनुभवी कुस्तीपटूविरूद्ध सातत्याने आक्रमक डाव खेळले.

    दुसऱ्या सत्रात पाकिस्तानचा कुस्तीपट्टू मुहम्मद इमान ग्रीप पासून पळत होता. दरम्यान, दीपकने इमानला रिंगच्या बाहेर ढकलत अजून एक गुण मिळवला. आघाडी ३ – ० अशी झाली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या इमानने बचावात्मक खेळ करत वेळ काढून शेवटच्या काही सेकंदात मोठा दाव खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र पुनियाने आपली पकड कायम ठेवत सुवर्ण पदक जिंकले.