दीप्ती शर्माची झंझावाती खेळी व्यर्थ, गुजरात जायंट्सने UP वॉरियर्सचा 8 धावांनी केला पराभव

दिल्ली कॅपिटल्सशिवाय मुंबई इंडियन्सने प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे. तर उर्वरित 1 जागेसाठी 3 संघ दावेदार आहेत.

  गुजरात जायंट्सने UP वॉरियर्सचा पराभव केला आहे. दीप्ती शर्माच्या झंझावाती खेळीनंतरही यूपी वॉरियर्सला 8 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या विजयानंतर गुजरात जायंट्सने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. मात्र, यूपी वॉरियर्सचा पराभव करूनही गुणतालिकेत गुजरात जायंट्स तळाच्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्सशिवाय मुंबई इंडियन्सने प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे. तर उर्वरित 1 जागेसाठी 3 संघ दावेदार आहेत. मात्र या 3 संघांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सर्वाधिक दावा आहे.

  दीप्ती शर्माची यूपी वॉरियर्सकडून तुफानी खेळी
  यूपी वॉरियर्ससमोर विजयासाठी 153 धावांचे लक्ष्य होते, परंतु 20 षटकात 5 गडी गमावून 144 धावाच करू शकले. अशाप्रकारे यूपी वॉरियर्सला 8 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. दीप्ती शर्मा यूपी वॉरियर्सकडून तुफान खेळली. दीप्ती शर्मा 60 चेंडूत 88 धावा करून नाबाद माघारी परतली, पण संघाला विजयापर्यंत नेऊ शकली नाही. पूनम खेमरने 36 चेंडूत 36 धावांचे योगदान दिले. मात्र याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. एलिसा हिलीशिवाय किरण नवगिरे, चमारी अटापटू, ग्रेस हॅरिस आणि श्वेता सेहरावत यांनी निराशा केली.

  गुजरात जायंट्ससाठी शबनम एमडी शकील ही सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. शबनम एमडी शकीलने विरोधी संघाच्या 3 फलंदाजांना बाद केले. याशिवाय कॅथरीन ब्रेयस आणि ऍशले गार्डनर यांना 1-1 असे यश मिळाले.

  बेथ मुनी आणि लॉरा वूलवर्थ यांची शानदार खेळी
  तत्पूर्वी, गुजरात जायंट्सची कर्णधार बेथ मुनीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरात जायंट्सने 20 षटकात 8 विकेट गमावत 152 धावा केल्या. गुजरात जायंट्सकडून कर्णधार बेथ मुनीने सर्वाधिक 74 धावांची खेळी खेळली. लॉरा वूलवर्थने 43 धावांचे योगदान दिले.