बलाढ्य अर्जेंटिनावरील सौदी अरेबियाचा विजय सार्वजनिक सुट्टी देऊन साजरा

    कतार मध्ये सुरु असलेल्या जगातील सर्वात मोठ्या फिफा विश्वचषक स्पर्धेत मोठे उलटफेर पहायला मिळत आहेत. जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानावर असलेल्या बलाढ्य संघांना अनेक कमकुवत संघ धूळ चारत असून सामन्यांचे निकाल अनपेक्षित लागत आहेत. मंगळवारी सौदी अरेबियाने फुटबॉल मधील बलाढय संघ समजल्याजाणाऱ्या अर्जेंटिना संघाचा २-१ ने पराभव केला होता. या पराभवामुळे अर्जेंटीना आणि मेस्सीचे चाहते नाराज असले तरी सौदी अरेबियात मात्र हा विजय मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या संघाच्या कामगिरीवर खुश होऊन सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी बुधवारी देशातील सर्वच सरकारी, खाजगी कर्मचाऱ्यांना आणि देशातील विविध शैक्षणिक संस्थांना एक दिवसाची सुटी जाहीर केली होती.

    सलग ३६ आंतरराष्ट्रीय सामन्यांत अर्जेंटिनाचा संघ अपराजित राहिला होता. त्यामुळे सौदी अरेबियाचा फुटबॉल संघ त्यांना हरवू शकेल असे कोणालाही वाटत नव्हते. मात्र मंगळवारी झालेल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत ५१ व्या स्थानावर असलेल्या सौदी अरेबिया संघाने त्यांचा पराभव केला. अशक्यप्राय वाटणारा विजय साकारल्याने सौदीच्या राजघराण्याने खुश होऊन बुधवारी देशाला एक दिवसाची सुटी दिली होती आणि आपल्या संघाचा विजय साजरा केला.