स्पेनचा कोस्टा रिकावर ७-० ने दणदणीत विजय

सामन्यात अतिरिक्त वेळ मिळाल्यावर, अल्वारो मोराटानं (Álvaro Morata) संघासाठी सातवा गोल केला. फिफा विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात स्पेननं तब्बल ७ गोल डागत ऐतिहासिक विजय मिळवला.

    कतार येथे सुरु असलेल्या फिफा विश्वचषक २०२२ मध्ये स्पेन आणि कोस्टा रिका यांच्यात फ़ुटबॉलचा सामना पार पडला. या सामन्यात स्पेनच्या फुटबॉल संघाने विश्वचषकात धमाकेदार सुरुवात करून कोस्टा रिका संघाचा ७-० ने पराभव केला. या विजयासह स्पेननं फिफा विश्वचषकात तीन गुणांची कमाई केली असून या विश्वचषकातील स्पेनचे वजन चांगलेच वाढले आहे.

    फिफाच्या जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या स्पेननं कोस्टा रिकाला सामन्याच्या सुरुवातीपासूनच गोल करण्याची एकही संधी दिली नाही. स्पेननं फर्स्ट हाफमध्येच तीन गोल केले. सामन्यातील पहिला गोल स्पेनच्या डॅनी ओल्मोनं (Dani Olmo) अकराव्या मिनिटालाच केला होता. यानंतर एकविसाव्या मिनिटाला दुसरा गोल डागला. स्पॅनिश खेळाडू मार्को एसेंसिओनंही (Marco Asensio) मिळवलं. त्यानंतर तिसरा गोलही स्पेनच्या फेरान टोरेसनं (Ferran Torres) ३१व्या मिनिटाला डागला आणि संघाला सामन्यात आघाडी मिळवून दिली.

    सेकंड हाफमध्ये कोस्टा रिकाचा संघ काही खास कामगिरी करून दाखवेल असं वाटत होतं त्यांना ते शक्य झाले नाही. सेकंड हाफमध्येही स्पेनचा खेळाडू फेरान टोरेसने चौथा गोल केला. सामन्यातील त्याचा हा सलग दुसरा गोल ठरला. सामना संपायला काही मिनिटं शिल्लक असताना स्पेन संघाने आणखी तीन गोल केले. सामन्यात अतिरिक्त वेळ मिळाल्यावर, अल्वारो मोराटानं (Álvaro Morata) संघासाठी सातवा गोल केला. फिफा विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात स्पेननं तब्बल ७ गोल डागत ऐतिहासिक विजय मिळवला.