स्टार फलंदाज दिनेश कार्तिक बाबत भारताच्या माजी खेळाडूने व्यक्त केले ‘हे’ मत , म्हणाले

    भारतीय संघाचा स्टार फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये जात आहे.  ज्यावेळी भारतीय संघाला गरज पडली त्यावेळी त्याने चमकदार कामगिरी करून संघाला विजयाच्या दिशेने नेले आहे. त्यामुळे त्याला भारतीय संघाचा फिनिशर म्हणून ओळखले जात आहे. आयपीएलपासून दिनेश कार्तिक भारतीय संघात आपले स्थान पक्के करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला भारतासाठी टी-२० (T20)विश्वचषक खेळायचा आहे, परंतु भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू के श्रीकांत यांनी कार्तिक बाबत बोलत असताना, कार्तिकला फिनिशर म्हणता येणार नाही असे मत व्यक्त केले आहे.

    के श्रीकांत (K Shirkant) म्हणाले, “फिनिशरची तुमची व्याख्या ही चुकीची आहे. दिनेश खूप छान खेळतो त्याने आयपीएलमध्ये पण चमकदार कामगिरी केली आहे. पण तो फिनिशर नाही. जो खेळाडू ८ व्या किंवा ९ व्या षटकात सामना पूर्ण करू शकतो त्याला फिनिशर म्हणता येईल. खरा फिनिशर १६-२० षटके खेळत नाही. दिनेश कार्तिक जे करतोय त्याला फायनल टच म्हणता येईल”.

    टीम इंडियात दिनेश कार्तिक प्रदीर्घ कालावधीनंतर परतला आहे. आयपीएल २०२२ मध्ये त्याने आरसीबीसाठी अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले होते. आता कार्तिक टीम इंडियासाठी क्रिकेट प्रेमींच्या मनात सर्वात मोठा सामना विजेता म्हणून उदयास आला आहे. पुनरागमन केल्यानंतर दिनेश कार्तिकने टीम इंडियासाठी (Team India) अनेक सामने जिंकले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात त्याने १९ चेंडूत ४१ धावा करत सर्वांची मने जिंकली. त्याच्या कामगिरीच्या जोरावर तो टी-२० विश्वचषक खेळण्याचा मोठा दावेदार बनला आहे.