Rudi-Koertzen

एका रस्ते अपघातामध्ये माजी पंच रुडी कोर्टझेन (Rudi Koertzen ) आणि इतर तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात गाड्यांची टक्कर झाली होती. रुडी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ३३१ सामन्यांमध्ये त्यांनी पंच म्हणून काम केले होते.

    आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे  (ICC) माजी पंच रुडी कोर्टझेन (Rudi Koertzen ) यांचे आज निधन झाले आहे. ते ७३ वर्षाचे होते. रुडी मुळचे दक्षिण आफ्रिकेचे होते. मंगळवारी एका रस्ते अपघातामध्ये रुडी आणि इतर तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात गाड्यांची टक्कर झाली होती. रुडी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ३३१ सामन्यांमध्ये त्यांनी पंच म्हणून काम केले होते.

    पोर्ट एलिझाबेथ येथे १९९२मध्ये दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातून रुडी यांनी आपली कारकीर्द सुरू केली होती. त्यांनी २०९ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि १४ ट्वेंटी २० सामन्यांमध्ये पंचाची भूमिका पार पाडली होती.

    नव्याण्णवच्या विश्वचषकात इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात त्यांनी पंच म्हणून केलेलं काम कायम लक्षात राहील.याशिवाय, २००३ आणि २००७च्या विश्वचषकांतील अंतिम सामन्यात ते ‘तिसरे पंच’ होते. पुढे २०१०मध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी सामन्यानंतर कोर्टझेन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. कोर्टझेन यांच्या निधनानंतर क्रिकेट जगतातील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग फार भावूक झाला आहे. त्याने ट्विट करून कोर्टझेन यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.