लाईव्ह मॅचमध्ये गेली लाईट; पहा पुढे काय घडले?

    स्टेडियम मध्ये जाऊन लाईव्ह मॅच पाहण्याचा आनंद काही वेगळाच आहे. मात्र ऐन सामना सुरु असताना स्टेडियमची लाईट गेली तर? असे प्रसंग खेळ विश्वात क्वचितच घडतात. काल रविवारी अशीच एक घटना उत्तरप्रदेशातील एका स्टेडियम मध्ये घडली. सध्या भारतात दोन मोठ्या मालिका सुरू असून त्यापैकी एक म्हणजे लीजेंड्स क्रिकेट लीग (Legends Cricket League). या लीजेंड्स क्रिकेट लीग मध्ये जुने खेळाडू पुन्हा एकदा मैदानात आपले नशीब आजमावत आहेत. लखनौच्या एकना स्टेडियमवर रविवारी याचा एक सामना खेळला गेला. जिथे लेजेंड्स क्रिकेट लीगच्या सामन्यादरम्यान लाईट गेली आणि संपूर्ण मैदानात अंधार पसरला.

    रविवारी लिजेंड्स क्रिकेट लीगचा सामना सुरू असताना स्टेडियममध्ये अचानक लाईट गेली. सुमारे १५ मिनिटे स्टेडियममध्ये अंधार होता. हा एकना स्टेडियम प्रशासनाचा मोठा निष्काळजीपणा असल्याचे बोलले जात आहे. स्टेडियममध्ये अंधार पडल्यानंतर प्रेक्षकांनी मोबाईलचा फ्लॅश ऑन केला.

    थोडावेळ वाट पाहिल्यानंतर लाईट आली आणि त्यानंतर पुन्हा सामना सुरू झाला. पण उत्तर प्रदेशातील या स्टेडियमवर लाईव्ह मॅच सुरू असताना अशा प्रकारामुळे आयोजकांवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. स्टेडियममधील लाईट गेल्याबाबत यूपी पॉवर कॉर्पोरेशनकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. एकना स्टेडियमचा फ्लड लाइट जनरेटर सेटवरूनच चालतात, अशा परिस्थितीत येथे काही तांत्रिक बिघाड झाल्याने काही मिनिटे अंधार झाला, अशी माहिती देण्यात आली.