झुलनला कसे पडले ‘चकदाह एक्सप्रेस’ हे नाव? जाणून घ्या गोलंदाज झुलन गोस्वामीबद्दल काही खास गोष्टी

झुलन गोस्वामी हिने २० वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तिनं ३५० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. तिने एकदिवसीय सामन्यात २५० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. तिनं कसोटी क्रिकेटमध्ये ४४ आणि टी-२० मध्ये ५६ विकेट्स घेतल्या आहेत. महत्वाचं म्हणजे, ती एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०० पेक्षा अधिक विकेट्स घेणारी झुलन ही एकमेव खेळाडू आहे.

    भारताची महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी आज तिचा ४० वा वाढदिवस साजरा करीत आहे. झुलन ही भारताची वेगवान गोलंदाज असून तिच्या गोलंदाजीतील कौशल्यामुळे ती जागतिक क्रिकेटमध्ये नावारूपाला आली. झुलन गोस्वामीने जानेवारी 2002 रोजी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तिच्या वेगवान गोलंदाजीमुळे झुलनला ‘चकदाह एक्सप्रेस’ हे नाव पडले. झुलन ही जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे तेव्हा अशा भारतीय महिला क्रिकेटपटूच्या जीवनाविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

    झुलनने वयाच्या पंधराव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. १९९७ सालचा महिला विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना कोलकताच्या इडन गार्डन्स मैदानावर खेळवण्यात आला होता. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात झालेल्या ह्या सामन्यात झुलनने बॉल गर्ल म्हणून काम केले होते. बेलिंडा क्लार्क, डेबी हॉकली, कॅथरीन फित्झपॅट्रिक ह्या दिग्गज महिला क्रिकेटपटूंचा खेळ जवळून पाहिल्यानंतर झुलन अतिशय प्रभावित झाली होती. त्याच दिवशी तिने क्रिकेटमध्ये करियर घडविण्याचा निश्चय केला.

    कोलकात्यापासून ८० किमीवरील चकदाह गावात राहत असलेल्या झुलनला सुरुवातीच्या काळात सरावासाठी रोज पहाटे ४.३० च्या लोकल ट्रेनने प्रवास करावा लागत असे. इतर पालकांप्रमाणेच झुलनच्या पालकांचीही तिने अभ्यासावर अधिक लक्ष द्यावं, अशी इच्छा होती. मात्र प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तिने ह्या संघर्षाच्या काळावरही मात केली. झुलननं ६ जानेवारी २००२ रोजी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं.

    चकदाह एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी झुलन गोस्वामी आपल्या वेगासाठी प्रसिद्ध आहे. ५ फुट ११ इंच उंचीची झुलन प्रतितास १२० किमी वेगाने गोलंदाजी करू शकते. कॅथरीन फित्झपॅट्रिकच्या निवृत्तीनंतर झुलन ही महिला क्रिकेटमधील सर्वात वेगवान गोलंदाज असल्याचे मानले जाते. तसेच झुलन ही मूळची कोलकात्यातील चकदाह या गावात राहते. तेव्हा झुलनच्या गावाचे नाव आणि तिच्या गोलंदाजीचा वेग पाहून चाहत्यांनी तिचे नाव ‘चकदाह एक्सप्रेस’ म्हणून ठेवले आहे. झुलनच्या रुंद हास्यामुळे संघ सहकाऱ्यानी तिला ‘गॉझी’ हे टोपणनाव देखील दिलं आहे.

    झुलन गोस्वामी हिने २० वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तिनं ३५० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. तिने एकदिवसीय सामन्यात २५० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. तिनं कसोटी क्रिकेटमध्ये ४४ आणि टी-२० मध्ये ५६ विकेट्स घेतल्या आहेत. महत्वाचं म्हणजे, ती एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०० पेक्षा अधिक विकेट्स घेणारी झुलन ही एकमेव खेळाडू आहे.

    Chakda Express Poster Biopic On Jhulan Goswami
    Chakda Express Film Poster. This Movie is Biopic On Jhulan Goswami.

    भारतीय महिला क्रिकेटला २० वर्ष दिल्यानंतर सप्टेंबर २०२२ मध्ये इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात झालेली शेवटची मॅच खेळून झुलन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वाला अलविदा केला. लवकरच झुलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट निघणार असून यात अभिनेत्री अनुष्का शर्मा ही झुलनची भूमिका साकारणार आहे.