राहुल त्रिपाठीच्या अर्धशतकाच्या बळावर हैदराबादचा पंजाबवर 8 विकेटनी विजय; शिखर धवनची 99 धावांची खेळी व्यर्थ, तर ऑरेन्ज कॅपसाठी ‘यांच्यात’ लढत…

144 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या हैदराबादने सहज विजय मिळवला. सनरायझर्ससाठी राहुल त्रिपाठीने शानदार अर्धशतक ठोकले. त्याने 48 चेंडूत 74 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 10 चौकार आणि तीन षटकार मारले. कर्णधार एडन मार्कराम 21 चेंडूत 37 धावा करून नाबाद राहिला. त्याने सहा चौकार मारले. त्रिपाठी आणि मार्कराम यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. मयंक अग्रवाल 20 चेंडूत 21 धावा करून बाद झाला.

    हैद्राबाद : आयपीएलच्या (IPL) १६ व्या हंगामाचा थरार पूर्ण देशभर सुरू आहे. रविवारी हैद्राबाद (Hyderabad) आणि पंजाब (Punjab) किंग्ज यांच्या सामन्यात राहुल त्रिपाठीच्या अर्धशतकाच्या बळावर हैदराबादनं पंजाबवर 8 विकेटनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात एडेन मार्करामने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. प्रथम फलंदाजीकरिता उतरलेली पंजाब किंग्जची सुरुवात निराशाजनकच झाली. भुवनेश्वरकुमारच्या पहिल्याच चेंडूवर प्रभसिमरन सिंग पायचित होऊन तंबूत परतला. त्यानंतर आलेला शोर्ट हासुद्धा १ धावा करून पॅव्हेलिनमध्ये आला. त्यानंतर आलेला पंजाब किंग्जचा एकही फलंदाज पिचवर टीकू शकला नाही. कर्णधार शिखर धवनची एकहाती लढत चालूच होती. पंजाब किंग्जचे एकामागोमाग फलंदाज बाद होत होते. कर्णधार शिखर धवन पंजाबचा झेंडा घेऊन एकटाच लढत होता. सॅम कुरण व्यतिरिक्त पंजाबच्या एकाही फलंदाजाने दुहेरी धावसंख्या केली नाही. धवनने शानदार 99 धावांची खेळी केली. त्याचे एका धावेनं शतक हुकलं. हैदराबादच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत पंजाबला 143 धावांवर रोखले.

    राहुल त्रिपाठीची विजयी अर्धशतकी खेळी…

    दरम्यान, 144 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या हैदराबादने सहज विजय मिळवला. सनरायझर्ससाठी राहुल त्रिपाठीने शानदार अर्धशतक ठोकले. त्याने 48 चेंडूत 74 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 10 चौकार आणि तीन षटकार मारले. कर्णधार एडन मार्कराम 21 चेंडूत 37 धावा करून नाबाद राहिला. त्याने सहा चौकार मारले. त्रिपाठी आणि मार्कराम यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. मयंक अग्रवाल 20 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. हॅरी ब्रूकने 14 चेंडूत 13 धावा केल्या. राहुल त्रिपाठीच्या अर्धशतकाच्या बळावर हैदराबादने 17 चेंडू आणि आठ विकेट राखून पंजाबचा पराभव केला. पंजाबकडून अर्शदीप सिंह आणि राहुल चहर यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.

    धवन ऑरेन्ज कॅपचा मानकरी…

    शिखर धवन याने चेन्नई सुपर किंग्सचा युवा स्टार ओपनर ऋतुराज गायकवाड याला मागे टाकत ऑरेन्ज कॅप मिळवली आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेन्ज कॅप देण्यात येते. सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्याआधी धवन याला ऋतुराजला मागे टाकून ऑरेन्ज कॅप मिळवण्यासाठी 63 धावांची गरज होती. या सामन्याआधी शिखर धवन याच्या नावावर 126 आणि ऋतुराजच्या नावे 189 धावा होत्या. धवनने हैदराबाद विरुद्ध 63 वी धाव पूर्ण करताच ऑरेन्ज कॅप मिळवली.

    ऑरेन्ज कॅपसाठी चुरशीची लढत

    शिखर धवन – 3 सामने 225 धावा (ऑेरेन्ज कॅप)

    ऋतुराज गायकवाड – 3 सामने 189 धावा

    डेव्हिड वॉर्नर – 3 सामने 158 धावा

    जॉस बटलर – 3 सामने 152 धावा

    कायले मेयर्स – 3 सामने 139 धावा