मॅच फिक्सिंग प्रकरणी ‘या’ खेळाडूवर आयसीसीची कडक कारवाई

    क्रिकेट खेळाला जगभरातून मिळालेल्या लोकप्रियतेनंतर आता भ्रष्टाचार आणि मॅच फिक्सिंगचे (Match fixing) देखील ग्रहण लागले आहे. जगातील अनेक क्रिकेटपटूंना यापूर्वी मॅच फिक्सिंग प्रकरणी कारवाईला सामोरे जावे लागले असून आता यात अजून एक खेळाडू दोषी आढळला आहे. संयुक्त अरब अमिरातीतील (यूएई) एका खेळाडूवर मॅच फिक्सिंग प्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) १४ वर्षांची बंदी घातली आहे.

    मेहरदीप छावकर (Mehrdeep Chowkar), असं या क्रिकेटपटूचं नाव असून २०१९ मध्ये यूएई आणि झिम्बाब्वे यांच्यातील सीरिजमध्ये आणि त्याच वर्षी कॅनडाच्या जीटी-२० लीगमधील मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप मेहरदीपवर होता. या प्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान, ट्रिब्युनलनं मेहरदीपला आयसीसी आणि क्रिकेट कॅनडाच्या भ्रष्टाचारविरोधी संहितेतील ‘कोड सेव्हन’च्या उल्लंघनासाठी दोषी ठरवलं आहे. आयसीसीने एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली.

    आयसीसीच्या इंटिग्रिटी युनिटचे जनरल मॅनेजर अॅलेक्स मार्शल म्हणाले, “२०१८ मध्ये यूएईमध्ये क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्यानंतरच मेहरदीप छावकर तपासकर्त्यांच्या नजरेत आला होता. या स्पर्धेतही भ्रष्टाचार झाला होता. तेव्हापासून आयसीसीच्या अँटिकरप्शन युनिटचं छावकरवर लक्ष होतं. यानंतर त्याने २०१९ मध्ये यूएई-झिम्बाब्वे सीरिजमधील मॅचेस फिक्स करण्याचा प्रयत्न केला. आपल्या कृतीतून तो क्रिकेटचं नुकसान करण्याचा प्रयत्न करत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्याच्यावर कारवाई झाली.” भारतातही आतापर्यंत मॅच फिक्गिंगची अनेक प्रकरणं उघडकीस आली असून भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन, एस. श्रीशांत अशी काही प्रसिद्ध नावं मॅच फिक्गिंगमध्ये समोर आलेली आहेत.