World Cup 2023
World Cup 2023

  ICC Cricket World Cup 2023 : आयसीसी वर्ल्ड कप २०२३ चा अंतिम सामना रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हे दोन्ही संघ एकमेंकाविरोधात भिडणार आहेत. दोन्ही संघ भन्नाट फॉर्मात आहेत. त्यामुळे फायनलचा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. भारतीय संघाने लागोपाठ दहा सामन्यांत विजय मिळवलाय, तर ऑस्ट्रेलियाने आठ सामन्यात बाजी मारली आहे. भारताने न्यूझीलंडचा पराभव करीत फायनल गाठली तर ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेचा पराभव करीत भारतापुढे आव्हान उभे केले आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना भारताने 6 विकेट्सने आणि दक्षिण आफ्रिकेने 134 विकेट्सने पराभूत केले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी श्रीलंकेविरुद्ध विजयाचं खातं उघडलं. त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही.

  विश्वचषकात भारताविरोधात ऑस्ट्रेलियाचे पारडे जड

  ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीतील 7 आणि 1 उपांत्य सामना असे सलग 8 सामने जिंकले आहेत. आता फायनलमधील सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. पण विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा संघ नेहमीच वरचढ ठरलाय. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत प्रत्येक संघाविरोधात वर्चस्व राखलेय. याला भारतही अपवाद नाही. 2003 विश्वचषकाची फायनल आजही सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. तरिही भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना खासच असतो. विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पाहण्यासारखाच असतो. त्यामुळे सर्व चाहत्यांची याकडे निजरा खिळलेल्या असतात. विश्वचषकात भारताविरोधात ऑस्ट्रेलियाचे पारडे जड असल्याचे आकडेवारीवरुन दिसतेय. पण भारतानेही कडवी टक्कर दिली आहे. पाहूयात, या दोन संघाचे विश्वचषकातील आकडे काय सांगतात…

  विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आकडेवारी

  विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 13 वेळा सामना झालाय.

  ऑस्ट्रेलियाने आठ सामन्यात विजय मिळवलाय.

  भारताला पाच सामन्यात विजय मिळवता आला आहे.

  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आतापर्यंत एकही सामना बरोबरीत सुटला नाही अथवा रद्द झाला नाही.

  विश्वचषकात भारताविरोधात ऑस्ट्रेलियाची सर्वोच्च धावसंख्या 359 इथकी आहे.

  भारताची ऑस्ट्रेलियाविरोधात विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या 352 इतकी आहे.

  विश्वचषकात भारताविरोधात ऑस्ट्रेलियाची निचांकी धावंसख्या 128 इतकी आहे.

  विश्वचषकात भारताची ऑस्ट्रेलियाविरोधातील निचांकी धावसंख्या 125 इतकी आहे.

  विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना 13 जून 1983 रोजी झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 162 धावांनी विजय मिळवला होता.

  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकातील अखेरचा सामना 8 ऑक्टोबर 2023 रोजी झाला होता. त्यामध्ये भारताने सहा विकेटने विजय मिळवला.

  भारताविरोधात ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा विजय 1983 मध्ये झाला होता. 162 धावांनी भारताचा पराभव केला होता.

  भारताचा विश्वचषका ऑस्ट्रेलियाविरोधातील सर्वात मोठा विजय 1983 वर्ल्डकपमध्येच झाला होता. भारताने 118 धावांनी हा सामना जिंकला होता.
  आकडे पाहिल्यास, विश्वचषकात भारताविरोधात ऑस्ट्रेलियाचे पारडे जड दिसत आहे. पण सध्याच्या विश्वचषकात भारतीय संघ भन्नाट फॉर्मात आहे. विराट आणि रोहित यांच्या अनुभवासह युवा खेळाडूंचं मिश्रण… यामुळे टीम इंडियाने लागोपाठ दहा विजयाची नोंद केली. त्यात रोहितचं नेतृत्व… हेही महत्वाचं आहे. रविवारी होणाऱ्या सामन्यात टीम इंडियाचे पारडे जड मानले जातेय.