खेलो इंडिया युवा स्पर्धा सातवा दिवस, खो-खोमध्ये मुला-मुलींच्या संघांची विजयी सलामी, तामीळनाडू, तेलंगणाचा डावाने पराभव

खेलो इंडिया स्पर्धेत सातव्या दिवशी खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या संघांनी विजयी सलामी दिली. सायंकाळी झालेल्या सामन्यात मुलींच्या संघाने तामीळनाडूचा १ डाव आणि आठ गुणांनी पराभव केला. तामीळनाडूने आक्रमण करताना महाराष्ट्राचे अवघे तीन गडी बाद केले. महाराष्ट्राने त्यांच्या १४ गड्यांना गारद केले. तामीळनाडू दुसऱ्या डावातही तीनच गडी बाद करू शकला.

    पंचकुला, (हरयाणा) : खेलो इंडिया स्पर्धेत सातव्या दिवशी खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या संघांनी विजयी सलामी दिली. सायंकाळी झालेल्या सामन्यात मुलींच्या संघाने तामीळनाडूचा १ डाव आणि आठ गुणांनी पराभव केला. तामीळनाडूने आक्रमण करताना महाराष्ट्राचे अवघे तीन गडी बाद केले. महाराष्ट्राने त्यांच्या १४ गड्यांना गारद केले. तामीळनाडू दुसऱ्या डावातही तीनच गडी बाद करू शकला.

    दरम्यान, महाराष्ट्राच्या श्वेता वाघने (आंबेगाव, पुणे) २ मिनिटे १५ सेकंद संरक्षण केले. संपदा मोरे (उस्मानाबाद) ३ मिनिट २० सेकंद, जान्हवी पेठे (उस्मानाबाद) १ मिनिट ४५ सेकंद, श्रेया पाटील (कोल्हापूर) २ मिनिट ३० सेकंद, गौरी शिंदे, अश्विनी शिंदे (उस्मानाबाद), रूपाली राठोड (पुणे) व ऋषाली भोईर (सुरगणा, नाशिक) यांनीही अभेद्य संरक्षण केले. मुलीच्या दमदार कामगिरी नंतर मुलांनी सुद्धा साजेशा खेळ सादर केला.

    मुलांकडूनही आक्रमक खेळ

    मुलींनी विजय मिळवल्यानंतर मुले सुद्धा मागे राहिले नाहीत. मुलांच्या संघाने तेलंगणावर सहज विजय मिळवला. त्यांनीही एक डाव आणि ४ गुणांनी विजयी सलामी दिली. तामिळनाडूने आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांना महाराष्ट्राचे अवघे पाचच गडी बाद करता आले. महाराष्ट्राने त्यांचे १४ गडी बाद केले. परिणामी ९ गुणांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावातही महाराष्ट्राचे तेवढेच गडी तेलंगणाच्या तावडीत सापडले. महाराष्ट्राकडून सोलापूरच्या रामजी कश्यपने अष्टपैलू खेळ केला. त्याने तीन मिनिटे संरक्षण केले. तसेच तेलंगणाच्या सहा गड्यांना बाद केले. अहमदनगरचा नरेंद्र कातकडेही चमकला. त्याने दोन मिनिटे संरक्षण करीत दोन गडी आऊट केले. किरण वसावे (उस्मानाबाद)ने दीड मिनिट तर कोमल महाजन (नागपूर) यानेही नाबाद राहत दीड मिनिट संघाचे संरक्षण केले. महाराष्ट्राचे दोन्ही संघ सुवर्णपदकाचे दावेदार मानले आहेत.