India captain Rohit Sharma's international career completes 17 years, Rohit himself gives big update

Rohit Sharma : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय करिअरला 17 वर्षे पूर्ण झाली. त्यानंतर अजून किती दिवस क्रिकेट खेळणार, या प्रश्नावर रोहित शर्माने दिलखुलास उत्तरे देत माहिती दिली आहे. एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत 17 वर्षांच्या प्रवासाबद्दल भाष्य केले आहे. 17 वर्षांतील अभिमान्सपद क्षण कोणता हेदेखील त्याने सांगितले आहे.

  नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. यावरच रोहित शर्मा याने दुबईच्या प्रसिद्ध आय 103.8 या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबाबत मोठा खुलासा केला. यावेळी त्याने विविध विषयांवर भाष्य केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट गेल्या 17 वर्षांपासून खेळतोय. तुम्ही ज्या ठिकाणी खेळताय तिथून ते उच्च स्थानापर्यंत पोहोचणं हे सोपं नाही. 141 कोटी लोकसंख्येच्या देशातून येतो तिथे 15 खेळाडूंमध्ये निवड होणे हेदेखील सोपे नाही. तुमचं कठोर परिश्रम महत्त्वाचे असतात, त्याचबरोबर तुमची मेहनत आणि अनुभव आहे. पण, त्यासोबत नशिबाची साथदेखील महत्त्वाची आहे, असे रोहित शर्मा याने सांगितले. मला वेळोवेळी नशिबाची साथ मिळत गेली, असेदेखील रोहित शर्माने सांगितले आहे.

  कारकिर्दीत चढ-उतार येतच असतात त्यांना सामोरे जाणे महत्त्वाचे
  रोहित पुढं म्हणाला, कारकिर्दीत चढ-उतार पाहिले. क्रिकेट कारकिर्दीत अनेकदा कठीण काळ पाहिला. जेव्हा करिअर सुरु केलं तेव्हा संघात माझा सकारात्मक इम्पॅक्ट नव्हता. तो कठीण काळ होता.मी काय करु शकतो हे याचा विचार केला, असं रोहित शर्मा म्हणाला. सतरा वर्षांपासून क्रिकेट खेळतोय आणि काही वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार असल्याचं रोहित शर्मा म्हणाला.

  टीम इंडियाची कॅप मिळणं हे अभिमानास्पद
  संघातील खेळाडूंसमोर टीम इंडियाची कॅप मिळणं हा अभिमानास्पद होतं. लहान असताना जे परिश्रम केलं त्याचं फळ होतं. वयाच्या विसाव्या वर्षी ती कॅप मिळाली होती. त्यावेळी सतरा वर्षानंतर इथेच असेल असा विचार त्यावेळी केला नव्हता, असं रोहित शर्मा म्हणाला.

  छोटी छोटी ध्येय ठेवली तर जीवनात नक्कीच फायदा……
  मोठी ध्येय न ठेवता छोटी छोटी ध्येय ठेवली याचा जीवनात फायदा झाला, असं रोहित शर्मा म्हणाला. पुढील पाच वर्षात काय घडणार यापेक्षा तुमच्यापुढं महिनभरात किंवा दोन महिन्यात जे समोर येणार आहे, त्याचा विचार केला पाहिजे, असं रोहित शर्मानं म्हटलं.

  कर्णधारपदाबाबत केला मोठा खुलासा
  तुम्ही तुमच्या देशाचं नेतृत्त्व करता यापेक्षा मोठा सन्मान नसतो. मी कॅप्टनसी करेल असाही एक दिवस येईल असा विचार केला नव्हता. पण, चांगल्या गोष्टी चांगल्या लोकांबाबत घडत असतात, असे रोहित शर्माने म्हटले आहे. मला यापूर्वीचे भारतीय क्रिकेट संघाचे महान कॅप्टन खेळाडू माहिती होते. त्यांनी जो वारसा जपला होता तो पुढं नेण्याचं काम करायचं होतं. सध्या डाटा हा विरोधी संघासोबत तुमच्या स्वत:च्या कामगिरीचं विश्लेषण करण्यासाठी देखील महत्त्वाचं ठरतोय, असं रोहित शर्मा म्हणाला. सर्वांना एका दिशेनं घेऊन जायचा प्रयत्न असल्याचे रोहित शर्मा याने सांगितले.

  दबावाला सकारात्मक पद्धतीने घेतो
  मी दबावाला सकारात्मक पद्धतीनं घेतो. जोपर्यंत तुम्ही दबाव घेत नाही तोपर्यंत तुमचं खरं रुप समोर येत नाही. छोटी छोटी ध्येय मिळवत जाणे महत्त्वाचे आहे. दबाव नसल्यास तुम्ही तुमच्याकडे असणारी क्षमता समोर येत नाही, असे रोहित शर्मा याने सांगितले.