भारताचा हॉकीपटू हरमनप्रीत सिंगला सर्वोत्तम पुरुष हॉकीपटू पुरस्कार

    भारतीय हॉकीसाठी (Hockey) आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताचा पुरुष हॉकी संघाचा बचावपटू हरमनप्रीत सिंगची शुक्रवारी आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेकडून २०२१-२२ या सालातील सर्वोत्तम पुरुष हॉकीपटू म्हणून निवड करण्यात आली आहे. हरमनप्रीतने (Harmanpreet) हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सलग दुसऱ्यांदा पटकावला असून सलग दोन वेळा सर्वोत्तम हॉकीपटू ठरणारा तो चौथाच खेळाडू आहे.

    हरमनप्रीत हा भारतीय हॉकी संघाचा उपकर्णधार आहे असून त्याने प्रो हॉकी लीगमधील २०२१-२२ मोसमात १६ लढतींमध्ये १८ गोल केले आहेत. आशियाई चॅम्पियन्स करंडकातही त्याने सहा लढतींमध्ये त्याने ८ गोल केले. तसेच भारतीय संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये रौप्यपदक पटकावले. हरमनप्रीतने २९.४ गुणांसह पहिला क्रमांक पटकावला असून नेदरलँडच्या थिअरी ब्रिंकमन याला २३.६ गुणांची कमाई करता आली. तसेच बेल्जियमच्या टॉम बून याने २३.४ गुणांची कमाई केली. ब्रिंकमन दुसऱ्या आणि बून तिसऱ्या स्थानावर राहिला.

    आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेकडून हरमनप्रीतचा गौरव करण्यात आला. यामध्ये त्याच्याबाबत सांगण्यात आले की, हरमनप्रीत हा सध्याच्या युगातील सुपरस्टार हॉकीपटू आहे. तो एक अव्वल दर्जाचा बचावपटू आहे. प्रतिस्पर्ध्याला गोल करण्यापासून तो अगदी सहज रोखतो. त्याच्याकडे ड्रिबलींगची गुणवत्ता आहे. त्यामुळे तो भारतासाठी गोलदेखील करतो, अशा शब्दांत त्याच्या खेळाची स्तुती करण्यात आली.