अटीतटीच्या सामन्यात भारताचा 5 धावांनी पराभव; बांग्लादेशनं जिंकली मालिका

    मुंबई : भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात सुरु असलेल्या एक दिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा पाच धावांनी पराभव झाला. या पराभवासह भारतीय संघ तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 नं पिछाडीवर गेला आहे. बांग्लादेश येथील ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर हा सामान खेळवण्यात आला असून या सामन्यात भारतीय संघाने विजयासाठी अखेरपर्यंत झुंज दिली. मात्र बांग्लादेश संघाच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर ही झुंज अपयशी ठरली. त्यामुळे तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील 2 सामन्यांमध्ये विजय मिळवून बांग्लादेश संघाने ही मालिका जिंकली.

    नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांग्लादेशच्या संघाची सुरुवात झाली. बांगलादेशच्या संघानं दुसऱ्याच षटकात पहिली विकेट गमावली. मोहम्मद सिराजनं अनामुल हकला एलबीडब्लू करून मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. पावर प्लेमध्ये बांगलादेशच्या संघानं दोन विकेट गमावून 44 धावा केल्या. उमरान मलिकनं त्याच्या स्पेलमधील दुसऱ्या षटकात शांतोला क्लीन बोल्ड करून बांग्लादेशच्या संघाला तिसरा धक्का दिला. सुंदर वॉशिंग्टन सुंदरनं शाकीब हल हसनला झेल बाद केलं. शाकीब अल हसनला 20 चेंडूत 8 धावा करत्या आल्या. बांगलादेशच्या डावातील 19 व्या षटकात वॉशिंग्टननं रहीम (12 धावा) आणि अफीफच्या (0 धाव) रुपात बांगलादेशच्या दोन फलंदाजाला माघारी धाडलं. तर, उमरान मलिकनं महमूदुल्लाहला आऊट करून भारताला सातवं यश मिळवून दिलं. पण एका बाजूनं विकेट पडत असताना महेंदी हसननं नाबाद 100 धावा) संघाचा डाव सावरला आणि बांग्लादेशच्या संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवलं.

    बांग्लादेशनं दिलेल्या 266 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अतिशय खराब झाली. भारताच्या डावातील दुसऱ्या षटकात विराट कोहली आणि तिसऱ्या षटकात शिखर धवन बाद झाले. त्यानंतर भारताची धावसंख्या 39 असताना वॉशिंग्टन सुंदरच्या रुपानं संघाला तिसरा धक्का लागला. केएल राहुलही स्वस्तात माघारी परतला. दरम्यान, श्रेयस अय्यरनं (82 धावा) आणि अक्षर पटेल (56 धावा) यांनी अर्धशतकीय खेळी करत भारतीय संघाचा डाव सावरला. परंतु, 35 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर श्रेयस अय्यर मेहंदी हसनच्या गोलंदाजीचा शिकार ठरला. त्यानंतर 38 व्या षटकात अक्षर पटेलनंही आपली विकेट गमावली. फिल्डिंगदरम्यान दुखापतग्रस्त झालेला कर्णधार रोहित शर्मा आठव्या विकेट्ससाठी मैदानात आला. त्यानं भारताला विजय मिळवून देण्यासाठी एकाकी झुंज दिली. परंतु, तो अपयशी ठरला. भारतानं हा सामना पाच धावांनी गमावला. बांगलादेशकडून हुसेननं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, मेहंदी हसन आणि शाकीब अल हसन यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय, मुस्ताफिजुर रहमान आणि महमुदुल्लाह यांच्या खात्यात प्रत्येकी एक-एक विकेट्स जमा झाली.