भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत भारताची विक्रमी आघाडी

    सध्या भारत विरुद्ध इंग्लंड (India Vs England) यांच्या महिला क्रिकेट संघांमध्ये एक दिवसीय मालिका खेळवली जात असून दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडचा ८८ धावांनी पराभव केला. कॅंटरबरी येथे हा सामना खेळवला गेला असून हा सामना जिंकत ओडीआय मालिकेत भारताने २-० अशी विक्रमी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने जवळपास २३ वर्षांनी इंग्लंडमध्ये मालिका जिंकली आहे. त्याने १९९९ नंतर इंग्लंडच्या भूमीवर पहिली वनडे मालिका जिंकली होती. इंग्लंडमध्ये वनडेमध्ये सर्वाधिक द्विपक्षीय मालिका जिंकण्याच्या बाबतीत भारतीय संघ न्यूझीलंडसह संयुक्त दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

    इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने १४३ धावांची नाबाद खेळी खेळली. हरमनप्रीत कौरने १२ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १०० चेंडूत आपले शतक पूर्ण केले. कर्णधाराच्या स्फोटक फलंदाजीमुळे भारताने शेवटच्या पाच षटकांत ८० धावा जोडल्या आणि ५० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात ३३३ धावा केल्या. या मोठ्या धावसंख्येसमोर इंग्लंडचा संघ संपूर्ण षटकेही खेळू शकला नाही आणि ४४. २ षटकांत २४५ धावांत गारद झाला. डॅनियल वॅटने सर्वाधिक 65 धावा केल्या. रेणुका सिंगने ५७ धावांत चार बळी घेतले. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना २४ सप्टेंबर रोजी लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जाईल.