आजच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यांमध्ये पावसाचे सावट, कशी असेल खेळपट्टी

आजच्या सामन्यातही खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक ठरण्याचा अंदाज आहे. सामन्यादरम्यान ढगाळ आकाश असेल आणि हवामानात आर्द्रता असेल.

  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवा टी-२० : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील टी-२० मालिकेतील शेवटचा सामना आज रंगणार आहे. आजचा हा सामना बंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर (M. Chinnaswamy Stadium) खेळवला जाणार आहे. आजचा हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरु होणार आहे. या पाच सामान्यांच्या मालिकेमध्ये भारताच्या संघाने ३-१ अशी आघाडी घेऊन मालिका भारताच्या संघाच्या नावावर केली आहे. आज या मालिकेतील शेवटचा सामना बंगळुरुमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यावर पावसाचं सावट आहे का आणि बंगळुरुमध्ये आज हवामान कसं असेल हे जाणून घ्या.

  आज बंगळुरूमध्ये ढगाळ वातावरण आहे. आकाश पूर्णपणे ढगांनी झाकलेले असेल आणि हवामानात ८३ टक्के आर्द्रता असेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, बंगळुरुमध्ये आज पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पावसाची शक्यता फक्त तीन टक्के आहे. बंगळुरूमध्ये आज तापमान १८ ते २२ अंश या दरम्यान राहील. तसेच रात्रीच्या वेळीही दव दिसू शकते. त्यामुळे आज क्रिकेट चाहत्यांना संपूर्ण सामना पावसाच्या अडथळ्या विना बघायला मिळेल अशी अपेक्षा केली जाऊ शकते.

  बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडिअम गेल्या काही वर्षांपासून हे मैदान फलंदाजांसाठी खूप उपयुक्त ठरत आहे. इथली खेळपट्टी सपाट आहे, ज्यावर चेंडू सहज बॅटला लागतो. चौकारही लहान आहेत, त्यामुळे फलंदाजांना षटकार मारताना भीती वाटत नाही. या मैदानावर टी-२० मध्ये दोनशे धावा करणं सहज शक्य आहे. या खेळपट्टीवर दोनशेच्या धावसंख्येचा पाठलाग करणे फारसं अवघड गेलं नाही. आजच्या सामन्यात धावांचा पाऊस पडणार हे निश्चित आहे. आजच्या सामन्यातही खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक ठरण्याचा अंदाज आहे. सामन्यादरम्यान ढगाळ आकाश असेल आणि हवामानात आर्द्रता असेल. यामुळे वेगवान गोलंदाजांना काही प्रमाणात मदत मिळण्याची शक्यता आहे, पण दव पडल्यानंतर बाजी फलंदाजांकडे जाईल. या मैदानावर आयपीएलच्या मागील १४ सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ९ वेळा १८० धावसंख्या पार केली आहे.

  भारतीय संघ :
  सूर्यकुमार यादव (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड, इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आर. प्रसिध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार, दीपर चहर.

  ऑस्ट्रेलियन संघ :
  मॅथ्यू वेड (कर्णधार), जेसन बेहरनडॉर्फ, टिम डेव्हिड, बेन ड्वार्शुईस, नॅथन एलिस, ख्रिस ग्रीन, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, जोश फिलिप, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, केन रिचर्डसन.