भारतीय पोरींना आज दुसऱ्या विजयाची प्रतिक्षा; आज भारत-वेस्ट विंडीज यांच्यात लढत, सामना कधी व कुठे पाहणार? ‘हा’ बदल…

भारत आणि विंडीज (India-West Windies) यांच्यात बुधवारी म्हणजे आज विश्वचषकातील दुसरा सामना होणार आहे. हा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानी जाण्याची भारतीय महिला संघाला संधी आहे. त्यामुळं आज कोण जिंकणार याकडं क्रिकेटप्रेमीचे लक्ष लागलं आहे.

    केपटाऊन : महिला टी२० विश्वचषक स्पर्धेत (Women T-20 World Cup) भारतीय पोरींनी पहिल्या सामन्यात इतिहास घडवला. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला (Pakistan) सलामीच्या सामन्यात धूळ चारल्यानंतर आता भारतीय महिलांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळं भारतीय महिला संघाला आता टी-२० विश्वचषकात दुसरा सामना जिंकण्याची संधी आहे. भारत आणि विंडीज (India-West Windies) यांच्यात बुधवारी म्हणजे आज विश्वचषकातील दुसरा सामना होणार आहे. हा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानी जाण्याची भारतीय महिला संघाला संधी आहे. त्यामुळं आज कोण जिंकणार याकडं क्रिकेटप्रेमीचे लक्ष लागलं आहे.

    भारताचे पारडे जड…

    आतापर्यंत वेस्ट विंडीत आणि भारतीय संघाची कामगिरी पाहिल्यास भारतीय महिलांनी बाजी मारली आहे. भारताने आतापर्यंत सात वेळा विंडीजचा पराभव केलेला आहे. तर दुसरीकडे, पहिल्या लढतीत इंग्लंडविरुद्ध केलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर विंडीजचा विजयी पुनरागमनाचा प्रयत्न असेल. हेली मॅथ्यूजच्या नेतृत्वाखालील विंडीज संघाला गेल्या सलग १४ सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे विंडीजने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही विभागांत सुधारणा करणे गरजेचे आहे. त्यामुळे आता भारतीय महिला संघ वर्ल्डकपच्या ब गटात विंडीजला धूळ चारण्यासाठी उत्सुक असतील.

    यांच्या कामगिरीकडे लक्ष…

    आजच्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष असेल. तसेच फलंदाजीची बाजू देखील स्मृती मानधंनाच्या पुनरागमनाने भक्कम झाली आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये २.२० कोटींची बोली लागलेल्या जेमिमा व रिचा घोषने मोठ्या भागीदारीतून सलामीला विजय साजरा केला. यादरम्यान पाकिस्तानवर ७ गड्यांनी मात केली होती. जेमिमा पुन्हा सरस खेळीतून संघाचा दुसरा विजय निश्चित करण्यासाठी उत्सुक आहे. तर दुसरीकडे विंडीजविरुद्धच्या लढतीत भारतीय गोलंदाजांना आपल्या चुका सुधाराव्या लागतील. पूजा वस्त्राकर व रेणुका सिंह ठाकूर या मध्यमगती गोलंदाजांकडून संघाला अपेक्षा असतील. तसेच फिरकी गोलंदाज दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड यांच्यासमोर विंडीज संघाच्या आक्रमक फलंदाजांना रोखण्याचे आव्हान असेल.

    स्मृतीचे पुनरागमन…

    महिला आयपीएलमध्ये सर्वाधिंक बोली लागलेली स्मृती मानधंनाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात स्मृतीला दुखापतीमुळं खेळता आले नव्हते. उपकर्णधार स्मृती मानधनाच्या अनुपस्थितीतही भारताने पाकिस्तानविरुद्ध विक्रमी विजयाची नोंद केली. या सामन्यात भारताने १५० धावांचे आव्हान यशस्वीरित्या पार केले. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत धावांचा यशस्वी पाठलाग करताना भारताची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्यामुळे भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला आहे; परंतु भारताच्या गोलंदाज कामगिरी सुधारण्यासाठी प्रयत्नशील असतील.

    फलंदाजीकडून अपेक्षा…

    पाकिस्तानविरुद्ध धावांचा पाठलाग करताना  १८व्या षटकात रिचा घोषने लगावलेल्या तीन चौकारांमुळे भारताला विजय मिळवता आला. सलामीवीर शफाली वर्माला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे विंडीजविरुद्ध तिच्याकडून अधिक चांगल्या अपेक्षा असतील. यास्तिका भाटिया, कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्याकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा आहे. पाकविरुद्ध मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जने (३८ चेंडूंत नाबाद ५३) निर्णायक अर्धशतक झळकावत भारताला विजय मिळवून दिला होता.

    सामना कुठे व किती वाजता पाहता येणार…

    टि-२० महिला विश्वचषकतील आजता भारतीय महिलांचा दुसरा सामना आहे. हा सामना द. आफ्रिकेतील केपटाऊन येथे खेळवला जाणार आहे. सामन्याची वेळ सायंकाळी ६.३० वाजता आहे. तर सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स १ हिंदी दिसेल.