
भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात मंगळवारी खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा धुवा उडवत ७ विकेट्सनी सामना जिंकला. टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांची टी- २० (T- 20) मालिका खेळवली जात असून भारताच्या विजयानंतर आता या मालिकेत २-१ अशी कामगिरी करून भारत सध्या आघाडीवर आहे.
मंगळवारी ९:३० च्या दरम्यान सुरु झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडीजला स्वस्तात सर्वबाद करण्याची रणनीती भारताने आखली होती. पण वेस्ट इंडीजकडून काईल मायर्स याने एकहाती झुंज देत अखेरपर्यंत संघाचा डाव सावरला. त्याने ५० चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकार ठोकत ७३ धावा केल्या. मात्र भारतीय संघातील भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक दोन तर हार्दीक आणि अर्शदीप यांनी प्रत्येकी एक विकेट घेऊन गोलंदाजीची बाजू सावरली. त्यामुळे भारताने 164 धावांवर वेस्ट इंडीजला रोखलं. ज्यामुळे विजयासाठी भारता समोर २० षटकात १६५ धावांचं आव्हान होत.
१६५ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने केवळ ११ धावा करुन माघारी परतला. मात्र त्यानंतर श्रेयस अय्यर (२४) आणि पंत (३३) यांनी सूर्यकुमारला चांगली साथ दिली. सूर्यकुमार यादवच्या तुफान अर्धशतकासह (७६) पंतच्या नाबाद ३३ धावांच्या जोरावर भारतीय संघाने ७ विकेट्सने विजय मिळवला.