देशाला नेमबाजीत मिळालं पहिलं सुवर्ण, भारताच्या ‘या’ तीन खेडाळुंनी विश्वविक्रम मोडून रचला इतिहास!

रुद्रांक्ष, दिव्यांश आणि ऐश्वर्या या त्रिकुटाने भारतासाठी आश्चर्यकारक कामगिरी केली. या तिघांनी चिनी खेळाडूंचा विश्वविक्रम मोडून इतिहास रचला आणि २०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले

    2023 च्या आशियाई क्रीडा  (Asian Games 2023) स्पर्धेत नेमबाजी संघाने भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा अधिकृतपणे सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी देशाला पहिले सुवर्णपदक (India Wins First Asian Games 2023 Gold Medal) मिळाले आहे. पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी पाच पदके जिंकली होती, मात्र सुवर्णपदकांची यादी रिकामीच होती. नेमबाजी संघाने सोमवारी सुवर्ण सुरुवात करून देशाला या स्पर्धेत पहिले पदक मिळवून दिले आणि विश्वविक्रमही केला.
    पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल संघात ( Men’s 10m Air Rifle Team Event) रुद्राक्ष बाळासाहेब पाटील, दिव्यांश सिंग पनवार आणि ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर यांचा समावेश होता. भारतीय त्रिकुटाने हांगझोऊमध्ये इतिहास रचला. वैयक्तिक पात्रता फेरीत, भारतीय त्रिकुटाने एकूण 1893.7 गुण मिळवले आणि जागतिक विक्रम मोडला. याआधी नेमबाजी सांघिक स्पर्धेत सर्वाधिक धावा चीनच्या नावावर होत्या. चीनच्या खेळाडूंनी गेल्या महिन्यात बाकू वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 1893.3 गुण मिळवले होते. भारतीय संघाने चीनपेक्षा 0.4 गुण अधिक मिळवले आहेत.

    भारतीय नेमबाजांच्या अप्रतिम पराक्रमानंतर चीनने आशियाई रेकॉर्ड आणि गेम्स रेकॉर्ड्स चार्टवरही आपले स्थान गमावले आहे. आता टीम इंडियाचे नाव इतिहास आणि रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवले गेले आहे.
    पात्रता फेरीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला रुद्राक्ष ६३२.५ गुणांसह संघाचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू होता. ऐश्वर्या ६३१.६ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. तर दिव्यांशने ६२९.६ गुण मिळवले. कझाकस्तानच्या इस्लाम सत्पायेवपेक्षा जास्त इनर 10 असल्यामुळे तो कट करण्यात यशस्वी झाला. तिन्ही भारतीय नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र ठरले होते, परंतु नियमांनुसार एका देशाचे दोनच खेळाडू अंतिम फेरीत सहभागी होऊ शकतात. अशा परिस्थितीत दिव्यांशला बाहेर पडावे लागले. आता रुद्राक्ष आणि ऐश्वर्याकडूनही वैयक्तिक पदकांची आशा आहे.