india vs australia

भारतानं सामन्यात सुरुवातीपासून चांगली खेळी केली. ऑस्ट्रेलियाला 177 धावांत सर्वबाद करुन भारतानं पहिल्या डावात 400 धावा करत 223 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ 91 धावांत आटोपला आणि भारताने सामना 1 डाव आणि 132 धावांनी जिंकला आहे.

    नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs Aus) यांच्यात नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात (VCA Cricket Stadium) पहिला कसोटी सामना खेळवला गेला. (India vs Australia 1st Test) या सामन्यात भारतानं दमदार विजयाची नोंद केली आहे. भारतानं सामना 1 डाव आणि 132 धावांच्या फरकानं जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे.

    भारतानं सामन्यात सुरुवातीपासून चांगली खेळी केली. ऑस्ट्रेलियाला 177 धावांत सर्वबाद करुन भारतानं पहिल्या डावात 400 धावा करत 223 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ 91 धावांत आटोपला आणि भारताने सामना 1 डाव आणि 132 धावांनी जिंकला आहे. भारताकडून रवींद्र जाडेजाने दोन्ही डावात मिळून 7 तर अश्विननं दोन्ही डावांत मिळून 8 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) 120 तर अक्षर पटेल 84 आणि रवींद्र जाडेजा 70 यांनी सर्वाधिक धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा युवा फिरकीपटू टॉड मर्फीने एका डावातच 7 विकेट्स घेत चांगली कामगिरी केली पण अखेर सामना भारतानं मोठ्या फरकाने जिंकला आहे.

    सामन्यात आधी नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने फलंदाजी निवडली. चांगली धावसंख्या करण्याचा त्यांचा प्लॅन होता. मात्र जाडेजा आणि अश्विन यांनी अप्रतिम गोलंदाजी करत मिळून एकूण 8 विकेट्स घेतल्या. भारताने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 177 धावांत सर्वबाद केलं. यावेळी सर्वोत्तम गोलंदाजी रवींद्र जाडेजाने केली. त्याने 22 ओव्हरमध्ये 47 रन देत एकूण पाच गडी बाद केले. अश्विनने तीन विकेट घेतल्या. सिराज आणि शमीने प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून यावेळी कॅरी याने 37 तर लाबुशेनने 49 धावा केल्या.