भारताचे सर्वात वयोवृद्ध कसोटी क्रिकेटपटू दत्ताजी गायकवाड यांंचं निधन, वयाच्या 95 व्या वर्षी घेतला श्वास

1952 ते 1961 दरम्यान त्यांनी भारतासाठी 11 कसोटी सामने खेळले. 1959 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर त्यांनी राष्ट्रीय संघाचे नेतृत्वही केले होते.

    भारताचे सर्वात वयोवृद्ध कसोटी क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड (Dattajirao Gaikwad Passes Away) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. भारताचे माजी सलामीवीर आणि राष्ट्रीय प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे ते वडील होते. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरच श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने क्रिकेट विश्वातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    भारतासाठी खेळले 11 कसोटी सामने

    रिपोर्ट नुसार,  ते गेल्या १२ दिवसांपासून बडोद्यातील रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये (अतिदक्षता विभागात) जीवनमृत्यूशी झुंज देत होता. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1952 ते 1961 दरम्यान त्यांनी भारतासाठी 11 कसोटी सामने खेळले. 1959 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर त्यांनी राष्ट्रीय संघाचे नेतृत्वही केले होते.

    बडोद्याचे प्रतिनिधित्व केलं

    1952 मध्ये लीड्समध्ये त्यांनी इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले होते आणि त्यांचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 1961 मध्ये चेन्नई येथे पाकिस्तानविरुद्ध होता. दत्ताजीराव यांनी 1947 ते 1961 या कालावधीत रणजी करंडक स्पर्धेत बडोद्याचे प्रतिनिधित्व केले. त्याने 47.56 च्या सरासरीने 3139 धावा केल्या ज्यात 14 शतकांचा समावेश आहे.

    2016 मध्ये सर्वात वयस्कर क्रिकेटर बनले

    1959-60 मध्ये महाराष्ट्राविरुद्ध नाबाद 249 ही दत्ताजींची सर्वोच्च धावसंख्या होती. 2016 मध्ये ते भारताचे सर्वात वयस्कर कसोटी क्रिकेटपटू ठरले. त्यांच्या आधी दीपक शोधन हे भारताचे सर्वात वयस्कर कसोटीपटू होते. माजी फलंदाज शोधन यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी अहमदाबाद येथे निधन झाले.