Indian Doctors Olympics
Indian Doctors Olympics

  पुणे : यंग डॉक्टर्सं लीग (वायडीएल) यांच्या वतीने ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत पुण्यात ‘इंडियन डॉक्टर्स ऑलिंपिक’ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेत विविध ११ राज्यांतील डॉक्टर्स-खेळाडूंचा सहभाग असून, सांघिक आणि वैयक्तिक अशा एकूण ११ क्रीडाप्रकारांचा समावेश आहे.

  ‘इंडियन डॉक्टर्स ऑलिंपिक’

  याविषयी ‘इंडियन डॉक्टर्स ऑलिंपिक’ (आयडीएल) समितीचे अध्यक्ष डॉ. नचिकेत महींद्रकर आणि सचिव डॉ. अमित द्रविड यांनी पत्रकार परीषदेत माहीती दिली. ‘‘दुसऱ्याच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या डोक्टर्सचे आरोग्य चांगले राहावे या हेतूने आमची संघटना काम करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही स्पर्धा आयोजित केली आहे.

  देशात प्रथमच अशा प्रकारची आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेतून वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांना आपल्या क्रीडागुणांना दाखविण्याची संधी मिळणार आहे, असे द्रविड यांनी नमूद केले.

  २०० हून अधिक डॉक्टरांचा सहभाग

  या स्पर्धेत  क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल आणि थ्रो-बॉल हे सांघिक (टिम) खेळ तसेच बॅडमिंटन, टेनिस, अ‍ॅथलेटिक्स्, कॅरम, बुद्धीबळ, टेबल-टेनिस, लॉन-टेनिस असे वैयक्तिक क्रीडाप्रकार खेळविण्यात येणार आहेत, असे आयडीएल समितीचे सदस्य डॉ. नितीन गडकरी आणि डॉ. संदीप पाटील यांनी स्पष्ट केले. आयाेजन समितीत डॉ. राहुल पाटील, डॉ. अंकूश भंडारी, डॉ. वैभव दुधट यांच्यासह सुमारे २०० हून अधिक डॉक्टरांचा सहभाग आहे.

  या मैदानांवर होणार स्पर्धा

  या स्पर्धेतील सामने श्री शिवछत्रपती क्रीडा संकूल-बालेवाडी, पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना क्लब, व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी-सिंहगड रोड, स्केलअप अ‍ॅकॅडमी मैदान-वारजे, डीएसके स्टार क्रिकेट अ‍ॅकॅडमी-धायरी आणि शिंदे हायस्कूल-सहकारनगर अशा विविध मैदानांवर होणार आहेत. या स्पर्धा ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये होणार आहेत.

  दीड हजाराहून अधिक खेळाडू सहभागी

  स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा, केरळ, पश्‍चिम बंगाल, तामिळनाडू अशा विविध राज्यांतील डॉक्टर-खेळाडू सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील पुण्यासह मुंबई, ठाणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, बीड, लातूर, औरंगाबाद, रत्नागिरी, जळगांव, धुळे, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यातील दीड हजाराहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.