भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने सुवर्णपदकावर कोरलं नाव

    राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) उत्तम कामगिरी करत भारतीय पुरुष टेबल टेनिस (Table tennis)संघाने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. अंतिम सामन्यात भारतीय टेबल टेनिसच्या पुरुष संघाने सिंगापूरला मात दिल्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात अजून एका सुवर्ण पदकाची भर पडली आहे.

    टेबल टेनिसच्या उपांत्य फेरीत भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने नायजेरीवर (India vs Nigeria) ३ – ० अशी मात करत फायलनमध्ये एन्ट्री मिळवली आहे. अंतिम सामना मंगळवारी भारत विरुद्ध सिंगापूर या दोन संघांमध्ये खेळवण्यात आला होता. या अटीतटीच्या सामन्यात भारताने ३-१ च्या फरकाने सिंगापूरवर विजय मिळवला. सामन्यात सर्वात आधी भारताची अप्रतिम जोडी हरमीत देसाई आणि जी साथियान यांनी सिंगापूरच्या योंग क्यूक आणि यू एन पांग यांना १३-११, ११-७ आणि ११-५ अशा तीन सेट्समध्ये मात देत भारताला सामन्यात १-० ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात सिंगापूरच्या क्लियरन्स च्यूयू याने शरथ कमलला ११-७, १२-१४, ११-३ आणि ११-९ अशा फरकाने मात दिल्यामुळे सामन्यात दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत आले होते.

    नंतरच्या तिसऱ्या सामन्यात जी. साथियान याने अप्रतिम खेळ करत कोन पांग याला १२-१०, ७-११, ११-७ आणि ११-४ च्या फरकाने नमवत भारताला २-१ ची आघाडी मिळवून दिली. अखेरच्या सामन्यात हरमीत देसाईने क्लियरन्स च्यूयू याला ११-८, ११-५ आणि ११-६ च्या फरकाने मात देत सामना भारताला ३-१ ने जिंकून दिला. भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाच्या सुवर्ण कामगिरीमुळे यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात पाचव्या सुवर्णपदकाचा समावेश झाला आहे.