टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना

  दिल्ली : १६ ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेचे (T 20 World Cup) वेध जगभरातील क्रिकेट रसिकांना लागले आहेत. विश्वचषक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ देखील मागील अनेक दिवसांपासून या विश्वचषकासाठी सराव करीत होता. अखेर या स्पर्धेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला (Australia) रवाना झाला आहे. यावर्षीचा विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार असून २०२२ च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला सुपर-१२ च्या गट-२ मध्ये स्थान देण्यात आलं आहे.

  भारतीय संघाने (Team India) आता मिशन वर्ल्ड कप हाती घेतले आहे. या विश्वचषकातील जास्तीत जास्त सामने जिंकण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असणार आहे. भारतीय संघाला सुपर-१२ च्या गट-२ मध्ये स्थान देण्यात असून या गटात भारतीय संघासोबत पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या संघाचा समावेश आहे. भारतीय संघाने घरच्या मैदानावर तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा २-१ असा पराभव केला आहे.

  सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने विश्वचषकाबाबत अपडेट दिले. तो म्हणाला होता की, संघातील काही लोक ऑस्ट्रेलियाला गेलेले नाहीत. म्हणूनच आम्हाला तिथे लवकर जायचे आहे. पर्थच्या उसळत्या खेळपट्ट्यांवर तुम्ही काही सामने खेळलात तर तुम्हाला परिस्थिती कळेल. संघात समाविष्ट असलेल्या खेळाडूंपैकी केवळ ७ ते ८ खेळाडू यापूर्वी ऑस्ट्रेलियाला गेले असल्याचे रोहित शर्माने सांगितले होते. वर्ल्ड कपमधील भारतीय संघाचा पहिला सामना दिवाळीच्या एक दिवस आधी म्हणजे २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान (Paksitan)सोबत होणार आहे.

  अधिकृत वेळापत्रक :
  भारत विरुद्ध पाकिस्तान, २३ ऑक्टोबर, दुपारी १:३० (मेलबर्न)
  भारत विरुद्ध ग्रुप ए उपविजेता, २७ऑक्टोबर, दुपारी १२:३० (सिडनी)
  भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ३० ऑक्टोबर, दुपारी ४:३० (पर्थ)
  भारत विरुद्ध बांगलादेश, २ नोव्हेंबर, दुपारी १:३० वाजता (अ‍ॅडलेड)
  भारत विरुद्ध गट ब विजेता, ६ नोव्हेंबर, दुपारी १:३० वाजता (मेलबर्न)

  टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ :
  रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग. राखीव खेळाडू: मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.