टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघाची नवी जर्सी लाँच

    मुंबई : आयसीसीच्या टी २० विश्वचषक (ICC T20 World Cup)  स्पर्धेला ऑक्टोबर महिन्यापासून सुरुवात होणार आहे. या विश्वचषकासाठी सर्वच खेळाडूंनी कंबर कसली असून विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी सर्वचजण उत्सुक आहेत. दरम्यान भारताने यंदाच्या टी २० विश्वचषकासाठी नवीन जर्सी लाँच केली आहे. जर्सीचा फोटो आता समोर आलाअसून भारतीय संघाची नवी जर्सी चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. यात भारतीय संघाची पुरुष तसेच महिला संघाचे खेळाडू या नव्या जर्सी मध्ये पोज देताना दिसत आहेत.

    भारतीय संघ पुढील महिन्यात टी २० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियात (Australia)  रवाना होणार आहे. संघाची ही नवीन जर्सी निळ्या रंगाची असून या नवीन जर्सीमध्ये तीन तारे आहेत. थ्रीस्टार भारतीय संघाने तीन वेळा जगज्जेतेपद पटकावल्याची ही खूण आहे. भारतीय संघाने १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली प्रथम विश्वचषक जिंकला होता. टी २० विश्वचषकाच्या पहिल्या सत्रात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. या दोन विश्वचषकांनंतर भारतीय संघाने २०११ साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी २० विश्वचषकात भारतीय संघ चौथ्यांदा विश्वचषक जिंकण्याच्या उद्देशाने उतरणार आहे.

    विश्वचषकासाठी भारतीय संघ :
    रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.
    राखीव खेळाडू – मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर