भारताचा वेटलिफ्टर विकास ठाकूरला रौप्य पदक

    भारतीय वेटलिफ्टर्सची राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games २०२२) दमदार कामगिरी कायम असून पुन्हा एकदा भारतीय वेटलिफ्टर्सनी भारताला पदक मिळवून दिले आहे. भारताचा वेटलिफ्टर विजय ठाकूर (Vijat thakur) याने पुरुषांच्या ९६ किलो वजनी गटात रौप्य पदक (Silver medal) पटकावले आहे. मंगळवारी इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताचे हे तिसरे पदक असून आतापर्यंत भारताने आठ पदक वेटलिफ्टिंग या एकाच खेळात जिंकली आहेत. लॉन बॉल्समध्ये महिला संघाने आणि टेबल टेनिसमध्ये पुरुष संघाने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

    अंतिम सामन्यात विकासने सर्वात आधी स्नॅच राऊंडमध्ये १५५ किलोग्राम वजन उचलत तिसरं स्थान मिळवले. त्यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये मात्र त्याने अधिक दमदार कामगिरी करत तिसऱ्या प्रयत्नात १९१ किलोग्राम वजन उचलले. अशा पद्धतीने विकासने एकूण १५५+१९१ असे ३४६ किलोग्राम वजन उचलत दमदार अशी कामगिरी करून भारताला पदक जिंकवून दिले आहे.

    भारताला वेटलिफ्टिंगमध्ये आतापर्यंत ८ पदक प्राप्त झाली असून हे पदक मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये मीराबाई चानू, अचिंता शेउली, जेरेमी लालरिनुंगा यांनी सुवर्णपदक जिंकले असून संकेत सरगर, विकास ठाकूर आणि बिंद्याराणी देवी यांनी रौप्य पदक मिळवून दिले आहे. तर गुरुराजा पुजारी आणि हरजिंदर कौर यांनी कांस्य पदकाला गवसणी घातली आहे.