भारतीय महिला हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक

    बुधवारी बर्लिंगहम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताच्या महिला आणि पुरुष हॉकी संघांनी कौतुकास्पद कामगिरी केली. भारताच्या महिला हॉकी (Hockey) संघाने कॅनडावर ३-२ अशा फरकाने विजय मिळवून उपांत्य फेरीत धडक दिली. तर भारताच्या पुरुष संघाने हॉकी संघाने कॅनडाचा ८-० अशा फरकाने धुव्वा उडवत उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल केली आहे.

    उपांत्यपूर्व सामन्यात सलामी टेटे हिने तिसऱ्या मिनिटाला गोल करीत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. तर त्यानंतर २२ व्या मिनिटाला नवनीत कौरने भारतासाठी दुसरा गोल केला. त्यानंतर कॅनडाच्या हॉकीपटूंनी देखील जबरदस्त कामगिरी करीत झोकात पुनरागमन केले. ब्रिएन स्टेअर्सने २३ व्या मिनिटाला; तर हना हॉनने ३९ व्या मिनिटाला गोल करीत कॅनडासाठी २-२ अशी बरोबरी साधून दिली. ५१ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरील रिबाऊंडवर लालरेसियामी गोल केला आणि त्यामुळे भारताने विजयासह अंतिम चारमध्ये धडक मारली.

    अ गटामधून इंग्लंड आणि भारत या दोन देशांनी प्रत्येकी ३ विजय आणि ९ गुणांसह अंतिम चारमध्ये प्रवेश केला आहे. तसेच ब गटामधून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांचाही उपांत्य फेरीतील प्रवेश निश्‍चित समजला जात आहे. त्यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड असे सामने होण्याची शक्यता आहे. तसेच पुरुष संघाची देखील उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल झाली असून भारताच्या पुरुष हॉकी संघाने कॅनडावर बुधवारी ८-० असा दणदणीत विजय मिळवला. हरमनप्रीत सिंग आणि आकाशदीप सिंग यांनी प्रत्येकी २ गोल केले. तर अमित रोहिदास, ललित उपाध्याय, गुर्जंत सिंग आणि मनदीप सिंग यांनी प्रत्येकी १ गोल करून संघाला विजयाच्या दिशेने नेले.