स्पर्धेत अंपायरकडून भारतीय खेळाडूंवर अन्याय? पहा काय म्हणाला सेहवाग

    इंग्लंडच्या बर्लिंगहम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची (Commonwealth Game 2022) सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या ८ व्या दिवशी शुक्रवारी एकीकडे भारतीय कुस्तीपटूंनी पदकांची पाऊस पाडला तर दुसरी कडे भारतीय महिला हॉकी संघ (Indian Women Hockey Team) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात झालेल्या हॉकीच्या उपांत्य सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. याच सामन्यात झालेल्या एका घटनेवर भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने (Virendra Sehwag)ट्विटरवर आपला राग व्यक्त केला आहे.

    झाले असे कि, भारतीय संघाला पेनल्टी शूटआऊटमध्ये ‘फाऊल’चा सामना करावा लागला. भारतीय गोलकीपर आणि कर्णधार सविता पुनियाने पहिला शूट वाचवला होता, परंतु घड्याळ सुरू झाले नसल्याचे सांगत पंचांनी ते अवैध ठरवले. यातून भारतीय संघ सावरला नाही आणि पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतीय महिला हॉकी संघाला ३-० असा पराभव पत्करावा लागला.

    राष्ट्रकुल सारख्या एवढ्या मोठ्या क्रीडा स्पर्धेतील खेळात एवढा बेफिकीरपणा तोही इतक्या महत्त्वाच्या सामन्यात झाला याबाबत सध्या आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या वादग्रस्त पेनल्टी शूटचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करताना सेहवागने लिहिले की, “ऑस्ट्रेलियाकडून पेनल्टी हुकली आणि अंपायर म्हणाले सॉरी क्लॉक सुरू झाला नाही. क्रिकेटमध्ये पूर्वीही असा पक्षपातीपणा होत होता, जोपर्यंत आपण महासत्ता बनलो नाही, हॉकीमध्येही आपण लवकरच महासत्ता होऊ आणि मग सर्व घड्याळे वेळेवर सुरू होतील, मला माझ्या मुलींचा अभिमान आहे.”

    भारताने सामन्यात निर्धारित वेळेपर्यंत १-१ अशी बरोबरी ठेवली, त्यानंतर सामन्याचा निकाल शूटआऊटवर गेला. या वादग्रस्त पेनल्टी शूटनंतर भारतीय संघाचे मनोबल खचल्याने त्याचा परिणाम त्यांच्या खेळावरही दिसून आल्याचे पाहावयास मिळाले. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताचा ०-३ असा पराभव झाला. भारत अजूनही पदकाच्या शर्यतीतून बाहेर गेला नसून भारतीय संघ आता कांस्यपदकासाठी खेळणार आहे, तर ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरी गाठून किमान आपले रौप्यपदक निश्चित केले आहे.